तोटा कमी करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांचा निर्णय; 11 तारखेपासून अंमलबजावणी
प्रतिनिधी / कराड :
येथील नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला पाणी पुरवठय़ातून होणारा तोटा भरून काढण्यासाठी शहरात रोज दोन वेळा पाणी पुरवठा बंद करून मंगळवार 11 जानेवारीपासून रोज सकाळी एक तास पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली. शहरात गेली अनेक वर्षे सकाळी व सायंकाळी पाणी पुरवठा होत होता. मात्र आता ही प्रथा प्रशासक तथा मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी बंद केली आहे.
कराड नगरपालिकेच्या वतीने रोज सकाळी व सायंकाळी फिल्टर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र पाणी पुरवठा विभाग गेली अनेक वर्षे तोटय़ात आहे. पाणी पुरवठय़ासाठी पालिकेला वार्षिक 8 कोटी रूपयांचा खर्च येतो. यापैकी पाणीपट्टीच्या माध्यमातून केवळ साडे तीन कोटींची वसुली वार्षिक होत असते. सुमारे साडे चार कोटी रूपयांचा तोटा सहन करून पाणी पुरवठा करण्यात येतो. तोटय़ाच्या तुलनेत पाणीपट्टीही वाढवण्यात येत नव्हती. केवळ वार्षिक 60 रूपये गेल्या काही वर्षात वाढवले जात होते. मात्र तरीही तोटा भरून निघत नव्हता.
पाणी पुरवठा विभागाचा तोटा भरून काढण्यासाठी शहरात एकवेळ पाणी पुरवठय़ाचा प्रस्ताव प्रशासनाकडून नगरसेवकांना देण्यात आला होता. मात्र हा अप्रिय निर्णय घेण्यास आतापर्यंत कोणत्याही पंचवार्षिकमध्ये धाडस करण्यात आले नव्हते. सद्या नगरपालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाल संपुष्टात आला असून प्रशासक म्हणून मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पालिकेचा तोटा व खर्च कमी करण्यासाठी यापूर्वीच पावले उचलली आहेत. जनरल फंडातही खडखडाट निर्माण झाला असून तोही भरून काढण्यासाठी पावले उचलली आहेत. चौदाव्या वित्त आयोगातून वीज बिले भरली जात होती. मात्र पंधराव्या वित्त आयोगात मिळणारा निधी कमी असल्याने यापुढील काळात वीज बिलेही पालिकेला भरणे अवघड होणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन वेळ पाणी पुरवठा करताना जादा पाण्याचा नदीतून उपसा करावा लागतो. त्याच्या प्रक्रियेवरही खर्च येतो. आता एकवेळ पाणी पुरवठा होणार असल्याने उपशावरील खर्च कमी होणार आहे. तसेच दोन वेळ पाण्यामुळे त्याचा वापरही जास्त होत असून सांडपाणी प्रक्रिया पेंद्रावरही ताण वाढला आहे. त्यामुळे या प्रकल्पावरील सांडपाणी शुद्धीकरणाचा ताणही कमी होणार आहे. तोटा भरून काढण्यासाठी पाणीकर वाढवणे अथवा खर्च कमी करणे हे दोनच पर्याय पालिकेसमोर होते. यात नागरिकांवर पाणीपट्टी वाढीचा बोझा न टाकता एकवेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपाययोजनांमुळे वार्षिक दोन कोटी रूपयांचा तोटा भरणे काढणे शक्य होणार असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले.
आतापर्यंत आठवडय़ात रोज सकाळी पाणी पुरवठा होत होता. तर मंगळवार व शनिवारी सायंकाळी पाणी पुरवठा होत नव्हता. आता सायंकाळचा पाणी पुरवठा बंद होणार आहे. मंगळवार 11 जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन मुख्याधिकारी डाके यांनी केले आहे. सध्या सकाळी सुरू असणारा पाणी पुरवठा आठवड्यात सर्व दिवशी सध्या असणार्या वेळेत सुरू राहणार आहे.
शहरात पाण्याचा मोठा अपव्यव
शहरात रोज दोन वेळा पाणी पुरवठा होत असल्याने पाण्याचा अपव्यय मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे दिसत होते. अनेक ठिकाणी नागरिक वाहने धुण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करताना दिसतात. तर सकाळी भरलेले पाणी संध्याकाळी ओतून पुन्हा भरायचे, असा प्रघातही पडला होता. त्यामुळे पाण्याच्या वेळेत गटारेही तुंडुब वाहात असल्याचे दिसत होते.