प्रतिनिधी/ कराड
कोरोना संक्रमणाचा हॉटस्पॉट ठरलेला कराड, मलकापूरसह 13 गावांचा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. या परिसरात जिल्हाधिकाऱयांनी कालपासून शंभर टक्के लॉक डाऊनची अंमलबजावणी सुरू केली आहे. याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असला तरी दूध पुरवठा बंद असल्याने मोठी गैरसोय होत होती. हे ध्यानात घेऊन कराडसह 13 गावांत शुक्रवार 24 पासून घरपोच दूध पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती इन्सिडेंट कमांडर तथा प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
शुक्रवार 24 पासून सकाळी 6 ते 8 व संध्याकाळी 6 ते 8 या दोन्ही वेळेत सर्वांना घरपोच दूध उपलब्ध होणार आहे. कोयना दूध संघ शहरातील प्रमुख वितरकाकडे दूध पोहच करेल. ते पुढे नागरिकापर्यंत पोहोच करतील..नागरिकांनी गर्दी न करता फोन द्वारे मागणी करावी. दूध पुरवठा अव्याहतपणे चालू राहणार आहे. इतर मुख्य वितरक याना घरपोच दूध वितरणासाठी परवानगी देत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन दिघे यांनी केले आहे. दूध वितरणावर प्रशासनाचे लक्ष आहे नागरिकांनी दुधाच्या नावाखाली गर्दी केल्यास संबंधित दूध विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
गुरुवारी 23 पासून कराड मलकापूरसह परिसरातल्या तेरा गावात लॉक डाउनची कडक अंमलबजावणी जिल्हाधिकायांच्या आदेशान्वये होत आहे. यात रुग्णालय वगळता जीवनावश्यक सेवाही बंद होत्या. दूधपुरवठाही होत नसल्याने नागरिकांची विशेषतः लहान मुलांची गैरसोय होत होती. त्यामुळे दूध पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात येत होती. याची दखल घेऊन अखेर घरपोच दूध सेवेला परवानगी देण्यात आली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
नागरिकांनी दुधाच्या नावाखाली फिरत बसू नये. घरात बसून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी केले आहे. कराड नगरपालिका क्षेत्र, मलकापूर नगरपालिका क्षेत्र, जखीनवाडी, नांदलापूर, गोळेश्वर, कार्वे, कापील, सैदापूर, बनवडी, गोटे, वारुंजी, मुंढे, कोयना वसाहत या ग्रामपंचायतींचे क्षेत्र या कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवेतील दूध घरपोच पुरविणेबाबत उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, उपविभाग कराड ज्या प्रमाणे यंत्रणा उभारतील, त्याप्रमाणे दूध घरपोच वितरण करण्यासाठी सुट दिली असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी आदेशात म्हटले आहे.








