महसूल विभागात शुकशुकाट, तालुक्यात एकुण 352 रूग्ण उपचारात
वार्ताहर/ कराड
कोरोनाच्या अनुषंगाने नियमांची अंमलबजावणी व उपाययोजना करण्याची मुख्य जबाबदारी असलेले कराडचे तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यासह महसूल विभागातील सात कर्मचारी बाधित झाल्याने बुधवारी तहसील विभागात शुकशुकाट पसरला होता. आरोग्य विभागाने 53 कर्मचाऱयांची तपासणी केली यात सहा कर्मचारी बाधित आढळले आहेत.
सुरूवातीपासून कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरलेल्या कराड तालुक्यात बुधवार अखेर एकुण 38 हजार 865 बाधितांची नोंद झाली. यातील 37 हजार 699 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर 784 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 352 रूग्ण उपचारात आहेत. यातील तालुक्यात बुधवारी 107 नवीन रूग्ण आढळून आले. बाधितांची संख्या वाढत असलीतरी बहुतांश बाधितांत सौम्य लक्षणे असल्याने जवळपास 300 रूग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत.
दोन दिवसांपूर्वी कराडचे तहसीलदार कोरोना बाधित असल्याचे आढळले होते. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने मंगळवारी तहसील विभागातील एकूण 53 कर्मचाऱयांची तपासणी केली. यात नायब तहसीलदार, चालकासह सहा कर्मचाऱयांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तमुळे बुधवारी दिवसभर तहसील विभागात शुकशुकाट असल्याचे पाहावयास मिळाले.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तहसीलसह सर्वच शासकीय कार्यालयात लशीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय प्रवेश देण्यात येत नाही. तर मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. रस्त्यावर विनामास्क फिरणाऱयांवरही पोलिसांच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
कराड पालिकेतही एक अधिकारी बाधित
येथील नगरपालिकेतही करवसुली विभागातील अधिकारी बाधित झाल्याने पालिकेतही सर्व कर्मचारी व अधिकारी यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. नगरसेवकांचा कार्यकाल संपल्यापासून पालिकेतील वर्दळही कमी झाली आहे. मात्र करवसुली विभागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्व प्रशासन अलर्ट झाले आहे.









