प्रतिनिधी/कराड
खेळत असताना छोट्या तळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. कराडतील ईदगाह मैदानाच्या पाठीमागे शनिवार दि. 24 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शुभम धनाजी चौगुले (वय 11) व सुरज भरत भोसले (13, दोघेही रा. उर्दु हायस्कूलच्या पाठीमागे, जोशी गल्ली, कराड) अशी पाण्यात बुडून मयत झालेल्या लहान मुलांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, ईदगाह मैदानाच्या पाठीमागे असलेल्या छोट्याशा तळ्याशेजारी शनिवारी सायंकाळी 6 च्या सुमारास लहान मुले खेळत होती. खेळता खेळता शुभम व सुरज तळ्यातील पाण्यात गेले व बुडू लागले. याबाबतची माहिती काही मुलांनी तेथून जवळच असलेल्या जोशी गल्ली येथे येऊन लोकांना सांगितली. त्यामुळे तेथील युवकांसह नागरिकांना त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन मुलांना पाण्यातून बाहेर काढले व उपचारासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात हलविले. दरम्यान उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. यावेळी रूग्णालय परिसरात नातेवाईकांसह युवकांनी गर्दी केली होती.
घटनेची माहिती समजताच शहार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत घटनेची नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.










