तालुक्यात सरासरी 25 मिमि तर सुपने मंडलात सर्वाधिक 52 मिमि पावसाची नोंद
वार्ताहर/ कराड
शनिवारी संध्याकाळी वादळी वाऱयासह हजेरी लावलेल्या मुसळधार पावसाने रविवारीही दिवसभर कराड शहरासह तालुक्याला झोडपून काढले. तालुक्यात सरासरी 25 मिमि पावसाची नोंद झाली. तर सुपने मंडलात सर्वाधिक 52 मिमि पाऊस पडला आहे. अवेळी आलेल्या वादळी वारे व पावसाने शेतीचे व आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.
कराड शहरासह तालुक्यात शनिवारी संध्याकाळपासून वादळी वाऱयासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्रिवादळामुळे पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार शनिवारी दुपारपासूनच तालुक्यात सोसाटय़ाचा वारा वहात होता. तर संध्याकाळी सात नंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्रभर उघडझाप करणाऱया पावसाने रविवारी दिवसभर शहरासह तालुक्याला झोडपून काढले.
महसुल विभागाने रविवारी सकाळी घेतलेल्या आकडेवारीनुसार कराड तालुक्यात सरासरी 25 मिमि पावसाची नोंद झाली आहे. मंडल निहाय पाऊस पुढील प्रमाणे, कराड- 38 मिमि, सैदापूर- 40 मिमि, मलकापूर- 37 मिमि, कोपर्डे- 22 मिमि, मसूर- 17 मिमि, उंब्रज- 10 मिमि, शेणोली- 8 मिमि, कवठे- 15 मिमि, काले- 35 मिमि, कोळे- 25 मिमि, उंडाळे- 19 मिमि व सुपने मंडलात सर्वाधिक 52 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे.








