उपमुख्यमंत्री अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
वार्ताहर / कराड
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची 36 वी पुण्यतिथी बुधवारी साजरी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, सहकार पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार शशिकांत शिंदे, यशवंतराव चव्हाण यांचे पुतणे अशोक चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी समाधीस्थळी उपस्थित रहात अभिवादन केले. महाराष्ट्राच्या जडणघडणीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी वेळेवेळी घेतलेल्या निर्णयाचे दुरगामी परीणाम राज्याच्या विकासात दिसत आहेत, अशी प्रतिक्रीया अजित पवार यांनी दिली.
यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने पुण्यतिथीच्या निमित्ताने होणारी गर्दी टाळत अभिवादन करण्यात आले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेच्या वतीने समाधीस्थळ परिसरात सॅनिटायझरचे काम करण्यात येत होते. तर ठिकठिकाणी सॅनिटायझरचे स्टॅण्ड ठेवण्यात आले होते. अभिवादन करण्यासाठी येणाऱया सर्वांनी मास्क घालूनच समाधीस्थळी यावे, सोशल डिस्टन्स राखला जावा, याबाबत बागेच्या प्रवेशद्वारात फलक लावण्यात आले होते.
माजी आमदार आनंदराव पाटील, प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, पाटणचे सत्यजितसिंह पाटणकर, राजेश पाटील-वाठारकर, राजाभाऊ पाटील उंडाळकर, सुभाष शिंदे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सुनील पाटील, कराड उत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष देवराज पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, नगरसेवक विजय वाटेगावकर, राजेंद्र माने, इंद्रजित गुजर, नगरसेविका विद्या पावसकर, माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव, राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष प्रशांत यादव, अजितराव पाटील-चिखलीकर, झाकीर पठाण व यशवंतप्रेमी नागरिकांनी अभिवादन केले.
समाधीला अभिवादन केल्यानंतर पर्णकुटी येथे सुरू असलेल्या शब्दसुरांच्या सुमनांजली कार्यक्रमास मान्यवरांनी उपस्थिती लावली. समाधीस्थळी आलेल्या यशवंत समता ज्योतीचे अजित पवार यांनी स्वागत केले. त्यानंतर अजित पवार यांनी कराड येथील वेणूताई चव्हाण स्मारकास सदिच्छा भेट दिली. तेथे स्व. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित उपक्रमांवर बैठकीत चर्चा झाली.









