आयुर्वेदीक गार्डनला कराड पालिकेच्या नगरसेवक, अधिकाऱ्यांनी दिली भेट
गोडोली / प्रतिनिधी :
सातारा नगरपालिकेच्या छ.प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज आयुर्वेदिक गार्डनला कराडचे नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांच्यासह अधिकाऱ्यांनी शनिवारी भेट दिली. गार्डनविषयी सर्व माहिती घेऊन कराडमध्येही असे आयुर्वेदिक गार्डन उभारण्याचा मानस असल्याचे नगरसेवक राजेंद्रसिंह यादव आणि अधिकाऱ्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
सातारा नगरपालिकेच्या गोडोली येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून आणि नगरसेवक ॲड. डी.जी.बनकर यांनी विकसित केलेल्या छ. प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज आयुर्वेदिक गार्डन पहाण्यासाठी जिल्ह्याबाहेरून ही नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. या उद्यानाची महती ऐकून कराड नगरपालिकेचे नगरसेवक, अधिकाऱ्यांनी शनिवारी भेट दिली.
यावेळी ॲड. डी. जी. बनकर, पालिकेचे नगर अभियंता दिलीप चिद्रे यांनी त्यांचे स्वागत करून उद्यानात उभारण्यात आलेल्या मुझीकल फाऊंटन, आयुर्वेदिक पाथ, पिरॅमिड, ओपन सभागृह याबाबत माहिती दिली. उद्यानाचे खास आकर्षण असलेल्या आयुर्वेदिक पाथमध्ये फिरून पाहणी केली. पिरॅमिडमधे बसून सर्वांनी मेडीटेशनही केले. कराड शहरामध्ये अशी गार्डन उभारण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे राजेंद्रसिंह यादव आणि अधिकाऱ्यांनी सांगितले.









