वार्ताहर/ कराड
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी कराड शहर व वाहतूक पोलीस जिवाचे रान करीत आहेत. शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात बॅरिगेटींग करण्यात आले आहे. शहरात येणाऱया वाहनांची चौकशी करण्यात येत आहे. मात्र ही चौकशी अधिक कडक व्हावी यासाठी शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाका व कृष्णा कॅनॉल या दोन ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी शनिवारी भेट देऊन चेकपोस्टची पाहणी केली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील उपस्थित होते.
सुरवातीपासूनच कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरलेल्या कराड तालुक्यात दुसऱया लाटेने कोरोना बाधितांची व मृतांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. शुक्रवारअखेर तालुक्यात एकूण 13 हजार 249 रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 11 हजार 401 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर 365 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात 1483 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 981 रुग्ण घरी राहून उपचार घेत आहेत, तर 96 रुग्णांवर सहय़ाद्रि कारखान्यावरील कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर केवळ 406 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊननुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू रहात आहेत. दवाखाने व मेडिकल वगळता अन्य सर्व दुकाने 11 नंतर बंद होत आहेत. तरीही काही लोक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. पोलिसांच्या माध्यमातून अशा लोकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. घराबाहेर पडणाऱया नागरिकास सबळ कारण देता येत नसेल, तर त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांच्या माध्यमातून शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यावरही मोठय़ा प्रमाणात बॅरिगेटींग करण्यात आले आहे.
कोल्हापूर नाका व कृष्णा कॅनॉल या प्रवेशद्वारातून शहरात येणाऱया वाहनांची पोलीस पहिल्यापासूनच चौकशी करीत आहेत. मात्र ही चौकशी अधिक कडक होण्याच्या दृष्टीने या दोन्ही ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आली आहेत. पोलिसांचे पेट्रोलिंगही वाढवण्यात आले आहे. पालिका व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून 11 नंतर सुरू असणाऱया अथवा छुप्या पद्धतीने व्यवसाय करणाऱया दुकानांवर कारवाई करण्यात येत आहे.









