वार्ताहर / कराड
कराड शहराच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये राबवण्यात आली. यावेळी मुख्य बाजारपेठेसह शहरातील विविध भागातील जुनी अतिक्रमणे काढण्यात आली. सलग दहा ते पंधरा दिवस चाललेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेने शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. मात्र वर्षांनंतर पुन्हा शहराच्या रस्त्यांवर अतिक्रमणांनी हातपाय पसरायला सुरूवात केल्याने पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थितीकडे शहर वाटचाल करत आहे.
कराड नगरपालिकेच्या माध्यमातून 26 फेब्रुवारीच्या दरम्यान अतिक्रमण हटाव मोहिमेस प्रारंभ करण्यात आला होता. दत्त चौकापासून कृष्णा पूल व कृष्णा नाका ते चावडी चौक व मुख्य बाजारपेठेसह मंडई परिसर, कोल्हापूर नाका ते दत्त चौक आदी व अन्य भागातील अतिक्रमणे जमिनदोस्त करण्यात आली होती. मुख्य बाजारपेठेतील दुकानांचे फलक हटवताना पालिकेच्या कारवाईवर आक्षेप घेतल्याने पालिकेला अखेर ही कारवाई थांबवावी लागली होती. मात्र 8 ते 10 दिवसांच्या मोहिमेनंतर शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. अतिक्रमण हटाव मोहिमेनंतच शहरातील रस्ते किती मोठे आहेत, याची कल्पना शहरवासियांना आली होता.
ही परिस्थिती जास्त काळ टिकली नाही. अन्य वेळी अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर पून्हा काही दिवसातच जैसे थे परिस्थिती होती. तोच अनुभव सध्याही येत आहे. कारवाई दरम्यान मुख्य इमारतीच्या पुढे बांधलेली शेड, गाळे व अन्य जमीनदोस्त केलेली अतिक्रमणे पुन्हा बांधण्यात आली आहेत. तर काही ठिकाणी अतिक्रमणे बांधण्याची कामे सुरू आहेत. शहरातील सर्व रस्त्यांचा व फुटपाथचा कब्जा हातगाडा धारक व व्यावसायिकांनी घेतला आहे. अनेक व्यावसायिकांनी मुळ दुकानांच्या बाहेर शेड मारली आहेत.
शहरातील अतिक्रमणे पुन्हा वाढत असताना पालिका प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरातील रस्ते पुन्हा अरूंद होऊ लागले आहेत. शहरात अतिक्रमणे वाढत असताना पालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेते व गळय़ाला आल्यावर अतिक्रमण हटावची मोहीम राबवते. मात्र वाढलेली अतिक्रमणे काढताना पालिकेला अक्षरशः कसरत करावी लागते. त्यामुळे अतिक्रमणे होत असतानाच पालिकेने रोखण्याची गरज व्यक्त होत आहे. प्रत्येक वेळी अतिक्रमण हटाव मोहीमेवेळी मुख्य बाजारपेठेतील दुकानाबाहेरील गटारीवर असणाऱया पायऱया काढण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक वेळी अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर व्यावसायिकांना पुन्हा पायऱया बांधाण्याचा त्रास होता. यावेळी मात्र बहुतांश व्यावसायिकांनी दुकानाबाहेर गटारीवर लोखंडी पायऱया तयार करून घेतल्या आहेत. अनेक व्यावसायिकांनी दुकानाबाहेर साहित्य ठेवण्यासाठी फोल्ड होणारी स्टँड केली आहेत. दुकानांचे फलक तोडण्यात आले होते. ते नव्याने होत आहेत. मात्र अतिक्रमण निर्मूलन पथक स्थापन करण्याची पालिकेची घोषणा अजूनही कागदारवरच आहे.









