कराड / प्रतिनिधी :
सुरवातीपासूनच कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरलेल्या कराड तालुक्यात गेल्या चार दिवसांत बाधितांचा आकडा सरासरी 200 वर स्थिरावला असून, बरे होणारांची संख्या वाढली आहे. शुक्रवारअखेर तालुक्यातील केवळ 1830 रूग्ण उपचारात आहेत. त्यातही लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेले 1235 रूग्ण घरीच उपचार घेत आहेत. झपाटयाने होणाऱ्या रूग्णवाढीला ब्रेक लागल्याने दिलासा मिळाला असला तरी नागरीकांनी काळजी घेणे तितकेच महत्वाचे असल्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शुक्रवारअखेर कराड तालूक्यात एकुण 18 हजार 172 रूग्णांची नोंद झाली आहे. यातील 15 हजार 887 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 455 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अध्याप 1 हजार 830 रूग्ण उपचारात आहेत. यातील 1 हजार 235 रूग्ण घरीच उपचार घेत आहेत. तर सह्याद्री कारखाना व पार्ले येथील कोरोना सेंटरमध्ये 151 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरासह तालुक्यातील केवळ 444 रूग्ण विविध रूग्णालयात दाखल आहेत.
मे महिन्याच्या पहिल्या आठवडयात कराड तालुक्यात प्रचंड संख्येने रूग्णवाढ झाली. तालुक्यात 14 दिवसांत तब्बल 3 हजार 15 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासुन तालुक्यातील नव्याने सापडणाऱया रूग्णांचा आकडा सरासरी 200 वर स्थिरावला आहे. तर बरे होणारांची संख्या वाढली आहे. शुक्रवारी 205 नवीन रूग्णांची नोंद झाली तर 269 रूग्ण बरे झाले आहेत. कराडकरांना दिलासा मिळत असला तरी नागरीकांनी काळजी घेणे तितकेच महत्वाचे असल्याचे आवाहन करण्यात येत आहे.