ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या कराची शहरात एका खासगी बँकेच्या इमारतीत आज दुपारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात 14 जणांचा मृत्यू झाला असून, 12 जण गंभीर जखमी आहेत. त्यापैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, कराची मधील शेरशाह पराचा चौक परिसरात एका खासगी बँकेच्या खाली असलेल्या नाल्यात हा स्फोट झाला. या स्फोटामुळे बँकेच्या इमारतीसह शेजारील पेट्रोलपंपाचे आणि काही गाडय़ांचेही मोठे नुकसान झाले आहे. नाल्यातील गॅस गळतीमुळे हा स्फोट झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.