समाजवादी पक्षाकडून घोषणा : शिवपाल यादव ‘सायकल’ चिन्हासह मैदानात
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मैनपुरी जिल्हय़ातील करहल विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव यांनी शनिवारी पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत यासंबंधी घोषणा केली आहे.
अखिलेश यादव पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढविणार असून याकरता त्यांनी समाजवादी पक्षाकरता सुरक्षित मानल्या जाणाऱया मैनपुरीमधील करहल मतदारसंघाची निवड केली आहे. अखिलेश हे सध्या आझमगडचे खासदार आहेत.
मुलायम यांचा बालेकिल्ला
करहल विधानसभा मतदारसंघाला समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानले जाते. 1957 मध्ये करहल अनारक्षित मतदारसंघ घोषित करण्यात आला होता. समाजवादी पक्षाची 1992 मध्ये स्थापना करण्यात आल्यापासून मुलायम सिंह यादव यांचे या मतदारसंघात वर्चस्व राहिले आहे. 1995 मध्ये बाबूराम यादव यांनी सपच्या वतीने येथे पहिला विजय मिळविला होता. बाबूराम हे तीनवेळा आमदार राहिले. 2002 साली भाजपचे उमेदवार सोबरन सिंह यादव यांनी विजय मिळविला होता. 2007 पासून आतापर्यंत तीनवेळा सपच्या तिकिटावर सोबरन सिंह यादव यांनीच विजय मिळविला आहे.
मैनपुरीत सपचा प्रभाव
मैनपुरी जिल्हय़ात 4 पैकी तीन विधानसभा मतदारसंघांवर समाजवादी पक्षाचा कब्जा आहे. मोदी लाटेतही मैनपुरी, किशनी आणि करहलमध्ये सपचा उमेदवार विजयी झाला होता. केवळ भोगांव मतदारसंघात कमळ फुलले होते. परंतु अखिलेश यांनी करहल मतदारसंघाची निवड केल्याने याचा प्रभाव आता या क्षेत्रातील अन्य मतदारसंघांमध्येही दिसून येणार असल्याचे मानले जात आहे.
शिवपाल जसवंतनगरमध्ये
प्रगतिशील समाजवादी पक्षाचे प्रमुख शिवपाल यादव हे सपचे चिन्ह ‘सायकल’चा वापर करत निवडणूक लढणार आहेत. समाजवादी पक्षाने शिवपाल यांना त्यांचा पारंपरिक मतदारसंघ जसवंतनगरची उमेदवारी जाहीर केली आहे. शिवपाल हे या मतदारसंघात आतापर्यंत पाचवेळा विजयी झाले आहेत. हा मतदारसंघ मुलायम परिवाराचा गड मानला जातो. स्वतः मुलायम या मतदारसंघातून 7 वेळा विजयी झाले आहेत. सपकडून आणखीन 2-3 जणांना उमेदवारी मिळणार असल्याची अपेक्षा शिवपाल समर्थकाना आहे. याकरता शिवपाल हे अखिलेश यांच्या संपर्कात आहेत.









