प्रतिनिधी / कोल्हापूर
करवीर तालुक्यातील बच्चे सावर्डे येथे जमिनीच्या वादातून 16 नोव्हेंबर 2012 रोजी मारहाणीची घटना घडली होती. या खटल्यातील 9 जणांना येथील जिल्हा सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी बुधवारी 10 वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी 16 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील अमीत महाडेश्वर, ऍड. एस. एस. पाटील यांनी काम पाहिले.
खटल्याची पार्श्वभूमी अशी की, बच्चे सावर्डे येथे बाऊचकर कुटुंबात जमिनीच्या हद्दीतून वाद आहे. या वादातून 16 नोव्हेंबर 2012 रोजी सायंकाळी फिर्यादी डेअरीत दुध घालण्यास गेला असता संशयित तुकाराम सखाराम बाऊचकर याने तू तुझ्या मनाने हद्द ठरवतोस काय, असे म्हणत धमकी दिली व अन्य संशयित गुंगा बाऊचकर, विलास बाऊचकर, युवराज बाऊचकर, विजय बाऊचकर, गणेश बाऊचकर, अविनाश बाऊचकर, दीपक बाऊचकर, निलेश बाऊचकर, (सर्व रा. बच्चे सावर्डे) यांनी काठ्या, तलवार, कोयत्याने मारहाण करून जखमी केले. या घटनेची नोंद वारणा कोडोली पोलीस ठाण्यात झाली होती. या घटनेचा तपास कोडोली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक जे. बी. सुर्यवंशी यांनी केला होता. जिल्हा न्यायालयात न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. सरकार पक्षाकडून 11 साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा न्यायाधीश शेळके यांनी बुधवारी या खटल्यातील 9 आरोपींना 10 वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी 16 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली, या खटल्यात सरकार पक्षाला ऍड. झेबा पठाण, ऍड. गजानन कोरे, एम. एस. नाईक, उदय पाटील यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती ऍड. अमित महाडेश्वर यांनी दिली.









