शहीद जवानांना आदरांजली
उचगाव / वार्ताहर
पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले वीर जवान संग्राम पाटील व ऋषीकेश रामचंद्र जोंधळे यांना उचगाव हायवे चौकात करवीर शिवसेनेच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली. दरम्यान, या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी निदर्शनं करून पाकिस्तानच्या ध्वजाची होळी केली.
जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा (ता.करवीर) येथील जवान हवालदार संग्राम शिवाजी पाटील यांना शुक्रवारी मध्यरात्री पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात वीरमरण आले. गेल्याच आठवड्यात शुक्रवारी (दि.१३) जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात झालेल्या चकमकीत बहिरेवाडी (ता.आजरा) येथील ऋषीकेश रामचंद्र जोंधळे हा जवान शहीद झाला.
आठच दिवसात पाकिस्तानने दोन वेळा भ्याड हल्ला केल्याने शिवसेनेच्यावतीने जोरदार निदर्शने करत पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. यावेळी ‘अमर रहे, अमर रहे, वीर जवान संग्राम पाटील अमर रहे, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘जलादो जलादो, पाकिस्तान जलादो’ अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की, प्रतिहल्ला करून पाकिस्तानला नेस्तनाबूत करणे हीच शहीद जवानांना खरी श्रद्धांजली ठरेल. यावेळी अनेक शिवसैनिकांसह नागरिक ही सहभागी झाले होते.