खात्यांमधील रक्कम सरकारजमा होणार उद्योगांकडे 120 कोटींची कर थकबाकी
प्रतिनिधी/ पणजी
व्यावसायिक कर खात्याने राज्यातील कर थकबाकीदार असलेल्या 77 उद्योगांची बँक खाती गोठवली असून वसुलीच्या कारवाईत प्रथम टप्प्यात रू. 5 कोटी सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत. त्या 77 थकबाकीदारांकडे विविध करांची मिळून रू. 120 कोटीची रक्कम प्रलंबित असून ती वसूल करण्यासाठी खात्याने हे पाऊल उचलले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून 77 उद्योग विविध कारणे सांगून अनेक करांची सरकारला येणे असणारी थकबाकीची रक्कम चुकवत होते. अनेक नोटीसा पाठवूनही ती रक्कम भरली जात नव्हती. त्या करामध्ये व्हॅट, जीएसटी, ऐषोराम कर, मनोरंजन कर, प्रवेश कर, सीएसटी अशा विविध करांचा समावेश आहे.
खात्यातील रक्कम सरकारजमा होणार
या कर थकबाकीची वसुली व्हावी, म्हणून सदर खात्याने त्या उद्योगांची विविध बँकांमध्ये असलेली खाती गोठवली आणि तेथील रक्कम सरकारी तिजोरीत भरण्याचे निर्देश संबंधित बँकांना दिले आहेत. योग्य ती प्रक्रिया करून ती रक्कम तिजोरीत जमा करावी, असेही बँकांना कळवण्यात आले आहे.
वसुलीची ही कारवाई मोहीम खात्यातर्फे चालूच ठेवण्यात येणार असून संपूर्ण कराची वसुली केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. कोरोनाच्या संकटाचे निमित्त करून ती रक्कम चुकवण्यात येत होती. आता ते संकट कमी झाल्याने खात्याने अशा प्रकारे कारवाईचा बडगा उभारला आहे.









