गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, आमदार अनिलराव बाबर यांची उपस्थिती ; दादाशेठ कचरे मित्र परिवाराचे आयोजन
आटपाडी / प्रतिनिधी
बाळेवाडीचे सुपुत्र युवा उद्योजक दादाशेठ कचरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार व शनिवारी करगणी व बाळेवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी करगणीत होम मिनिस्टर व महिलांचा गौरव सोहळा होणार आहे. तर शनिवारी करगणीत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, आमदार अनिलराव बाबर यांच्या उपस्थितीत कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे
आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी येथील यशस्वी उद्योजक दादाशेठ कचरे हे सामाजिक जाणिव असणारे तरुण नेतृत्व म्हणून परिचित आहेत. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन त्यांच्या मित्र परिवाराने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज शुक्रवारी बाळेवाडी येथे सकाळी १० वाजता कै. महादेव कचरे करिअर अकॅडमी येथे चित्रकला, रांगोळी स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा होणार आहेत.
करगणी येथे आज सायंकाळी सहा वाजता अभिनेत्री माधुरी पवार हिच्या उपस्थितीत ग्रामपंचायत शेजारी होम मिनिस्टरचा कार्यक्रम होणार आहे. विजेत्या महिलांना पैठणी देवून गौरविण्यात येणार आहे. तर याच कार्यक्रमात आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या उपक्रमशील महिला सफाई कर्मचारी, महिला उद्योजिका यांचा सन्मान सोहळा होणार आहे.शनिवारी बाळेवाडी येथे दहा वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेल आहे. दुपारी ३ वाजता करगणी येथे जंगी कुस्ती मैदान होणार आहे. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, आमदार अनिलराव बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत १ लाख रूपये इनामाची पहिली कुस्ती होणार आहे. याशिवाय सुमारे ६० कुस्त्या मैदानात होणार आहेत.
कुस्ती मैदानानंतर राज्याचे गृहराज्यमंत्री शंमुराज देसाई, आमदार अनिलराव बाबर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दादाशेठ कचरे यांचा नागरी गौरव सोहळा होणार आहे. दादाशेठ कचरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासह आयोजित विविध कार्यक्रमांचा बाळेवाडीसह करगणी परिसरातील नागरिकांनी महिलांनी सहभागी होवुन लाभ घ्यावा, असे आवाहन युवा नेते विनायक मासाळ यांच्यासह दादाशेठ कचरे मित्र परिवाराने केले आहे.








