जिल्हय़ातील 450 हून अधिकांचा सहभाग : व्हॅक्सिन डेपो परिसर घोषणांनी दणाणला
प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कम्युनिटी हेल्थ कर्मचाऱयांना अद्याप सेवेत कायम करण्यात आलेले नाही. तसेच पगार कमी असून इन्सेन्टिव्हदेखील कमी दिला असल्याने तुटपुंज्या वेतनावर त्यांना काम करावे लागत आहे. या विरोधात शुक्रवारी
व्हॅक्सिन डेपो येथील जिल्हा वैद्यकीय अधिकाऱयांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
अखिल कर्नाटक राज्य कम्युनिटी हेल्थ अधिकारी नोकर संघ, बेंगळूर व टेड युनियन, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हय़ातील 450 हून अधिक कर्मचारी सहभागी होते. महाराष्ट्र, पंजाब, ओडिसा या राज्यांमध्ये कर्मचाऱयांना नोकरीत कायम करण्यात आले. परंतु नेमणुकीला 6 वर्षे उलटली तरी कर्नाटकात कंत्राटी पद्धतीवर काम सुरू आहे. महाराष्ट्रात 25 हजार वेतन व 15 हजार इन्सेन्टिव्ह दिला जात असताना कर्नाटकात मात्र 24 हजार वेतन व 8 हजार रुपये इन्सेन्टिव्ह दिला जात असल्याची तक्रार आंदोलकांनी केली.
दोन परीक्षा देऊन गुणवत्ता यादीद्वारे नेमणुका करण्यात आल्या आहेत. परंतु कंत्राटी पद्धतीने काम करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आमच्या शिक्षणाला काही महत्त्व आहे की नाही, असे म्हणत राज्य सरकार विरोधात कर्मचाऱयांनी घोषणा दिल्या. यामुळे व्हॅक्सिन डेपो परिसर दणाणून गेला. जिल्हय़ातील कर्मचारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
अधिकारीवर्गाची आडकाठी
संघटनेकडून शुक्रवारी संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात आले. आंदोलनासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱयांना माहिती देण्यात आली. परंतु शुक्रवारी सकाळी आंदोलनासाठी मंडप घालताना काही अधिकाऱयांकडून आडकाठी घालण्यात आली. व्हॅक्सिन डेपोच्या बाहेर आंदोलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परंतु आंदोलक कार्यालयासमोरच आंदोलन करण्यावर ठाम राहिल्याने अखेर उशिरा आंदोलन सुरू झाले.
अन्यथा अधिवेशनावेळी आंदोलन
इतर राज्यांमध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून काम करणाऱया कर्मचाऱयांना कायम केले. परंतु 6 वर्षे उलटली तरी अद्याप कर्मचाऱयांना कर्नाटक राज्य सरकारने कायम केलेले नाही. शुक्रवारी संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास बेळगावमध्ये होणाऱया हिवाळी अधिवेशनात आंदोलन करणार आहे.
– आनंद एस. (जिल्हाध्यक्ष कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)









