प्रतिनिधी / सातारा
कोरोनाबाधितवाढीचा वेग कमी आलेला असला तरी अल्पसंख्येने वाढ सुरुच आहे. दीपावलीच्या उत्साहात नागरिकांनी निष्काळजीपणा न दाखवणे गरजेचे आहे. दीपावली सण साजरा करतानाचा नागरिकांनी कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मास्क वापरावा, सुरक्षित अंतर ठेवावे तसेच प्रदुषण रोखण्यासाठी फटाक्यांपासून दूर रहावे. आतापर्यंत सर्वच सणांच्या वेळी नागरिकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य केलेच असून यापुढे देखील जिल्हय़ात कमी होत असलेला कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू देवू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधताना जिल्हावासियांना केले आहे.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी 32 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर गेल्या 24 तासात फक्त 3 बाधितांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. रात्रीच्या अहवालात 141 जणांचा अहवाल बाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
प्रदुषण रोखण्यासाठी फटाके वाजवूच नका
दीपावली हा दिव्यांचा उत्सव आहे. मात्र मार्चपासून सर्व जगावरच कोरोनाचा अंधकार पसरला आहे. तो दूर करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्र्यांनी देखील दीपावलीत काळजी घेण्याबरोबरच फटाके वाजवू नका असे आवाहन केले आहे. कोरोनामुळे फुफ्फुसाला त्रास होते व त्यामुळे श्वास घेण्यासही त्रास होतो. जर फटाके वाजवले तर आवाजाबरोबर हवेतही प्रदुषण होईल. त्याचा सर्वांनाच त्रास होणार आहे. तो होवूच नये यासाठी फटाके वाजवू नका, तसेच खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करु नका. घरातच पुजा व दीपोत्सव साजरा करुन कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
परिस्थिती आटोक्यात येतेय पण..
कोरोना स्थितीचे जिल्हय़ात आटोक्यात येवू पहात असतानाच जिल्हाभरात दीपावलीचा उत्साह दुणावलाय. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील भीतीचा पगडा गायब होवू लागला. मात्र, भीती घ्यायचीच नाही पण काळजी घेण्याशिवाय पर्यायही नाही अशा स्थितीत सर्वजण वाटचाल करत आहोत. त्यामुळे बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी, नियमांचे उल्लंघन न परवडणारी बाब ठरु शकते. त्यामुळे दुकानदारांसह बाजारपेठेत जाणाऱया नागरिकांनी नियम पाळलेच पाहिजेत. सुदैवाने जिल्हय़ातील परिस्थिती आटोक्यात येत असताना धोका पत्करणे कोणाच्याही फायद्याचे ठरणार नाही. दुसरी लाट येवूच नये यासाठी स्वतःसह कुटुंबाची, समाजाची काळजी घेण्यासाठी सर्वांनी सजग राहावे असे सांगत शेखर सिंह यांनी जिल्हावासियांना दीपावलीच्या शुभेच्छाही व्यक्त केल्या आहेत.
जिल्हय़ात 5,632 बेड रिक्त
कोरोनाविरुध्दच्या लढाईसाठी आरोग्य विभाग सुसज्ज आहे. जिल्हय़ात एकूण .6,814 बेड आहेत. त्यापैकी कोरोना केअर सेंटरमध्ये 4,100 बेड असून त्यापैकी 3,779 बेड रिक्त आहेत. तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर डीसीएचसी आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल डीसीएच बेड क्षमता 2,714 एवढी असून रिक्त बेड 1,851 एवढे आहेत. यामध्ये ऑक्सिजनशिवाय रिक्त बेड 495, ऑक्सिजन रिक्त बेड 1,053 व आयसीयूचे 303 बेड रिक्त असले तरी बेड रिक्त राहून कोरोना संपलेली दिलासादायक स्थिती अनुभवण्यासाठी काळजी हाच पर्याय हातात असून प्रशासनाचे नियम पाळूनच वाटचाल करावी लागणार आहे.
सातारा, खटाव, माणवासियांना सावरावे लागेल
कोरोना संसर्ग स्थिती कराड व सातारा हे हॉटस्पॉट ठरले होते. मात्र कराडमध्ये नवीन रुग्ण वाढ अत्यंत अल्प ठरल्याने कराडकरांना मोठा दिलासा मिळालाय. तर सातारकर सावरण्याचा प्रयत्न करत असताना खटाव, माणमध्ये वाढणारी बाधितांची संख्या चिंता वाढवणारी आहे. बाधित वाढीचा आलेख खाली घसरला असला तरी सर्वच तालुक्यात हा आलेख खाली वर करत अस्तित्व राखून आहे. त्यामुळे सातारा, खटाव, माण, कोरेगाव, फलटणवासियांना सावरण्याची गरज आहे.
जिल्हय़ात 3 बाधितांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये म्हसवड, ता. माण येथील 60 वर्षीय पुरुष, तसेच जिह्यातील विविध खाजगी हॉसिपटलमध्ये धोंडेवाडी ता. खटाव 80 वर्षीय पुरुष तसेच उशीरा कळविलेले सातारा 71 वर्षीय महिला अशा एकूण 3 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
291 जणांचे नमुने तपासणीला
जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय सातारा 21, कराड 14, फलटण 10, कोरेगांव 23, वाई 27, खंडाळा 19, रायगाव 37, पानमळेवाडी 24, मायणी 8, दहिवडी 8, म्हसवड 18, पिंपोडे 6, तरडगाव 12 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 64 असे एकूण 291 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 2,10,859
एकूण बाधित 48,296
एकूण कोरोनामुक्त 43,874
मृत्यू 1,621
उपचारार्थ रुग्ण 2,801
मंगळवारी
एकूण बाधित 141
एकूण मुक्त 32
एकूण बळी 03
मंगळवारची स्थिती
एकूण बेड ………….6,814
एकूण उपचारार्थ ….. 2,660
दाखल रुग्ण ………..863
होम आयसोलेट ……1,478
रिक्त बेड ……………5,632
कोरोना केअर सेंटर
(क्षमता 4,100 पैकी दाखल 321)
रिक्त बेड 3,779
डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर डीसीएचसी आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल डीसीएच
(2,714 क्षमतेपैकी दाखल 863)
रिक्त बेड 1,851
दवाखान्यात दाखल 863 पैकी
ऑक्सिजनशिवाय : 216 (क्षमता 711) *रिक्त 495*
ऑक्सिजनसह : 488 (क्षमता 1,541) *रिक्त 1,053*
आयसीयू : 168 (क्षमता 462) *रिक्त 303*