धूळ आणि प्रदूषणामुळे त्वचेचं बरंच नुकसान होतं. उन्हाळ्यात खूप घाम येत असल्यामुळे धूळ, प्रदूषित कण चेहर्यावर चिकटून बसतात. यामुळे चेहर्यावरची रोमछिद्रं खुली होतात. उन्हाळ्यात मोठी झालेली ही रोमछिद्रं खूपच वाईट दिसतात. त्यातच धुलीकण, घाम, माती रोमछिद्रांमधून त्वचेच्या आत प्रवेश करत असल्यामुळे चेहर्यावर मुरुमं, पुटकुळ्या आणि फोड येऊ लागतात. काही घरगुती उपायांनी या रोमछिद्रांचा आकार कमी करता येईल. त्याविषयी…
- संत्र्याची साल किंवा रसाचा वापर करून रोमछिद्रं लहान करता येतील. यासाठी संत्र्याची साल चेहर्यावर घासा. तसंच चेहर्याला संत्र्याचा रस लावा. संत्र्याच्या सालामुळे चेहरा स्वच्छ होतो. रोमछिद्रांमध्ये अडकलेले धुलीकणही निघून जातात.
- ऍपल सिडर व्हिनेगार या कामी उपयुक्त ठरू शकतं. व्हिनेगारमधल्या आम्लांमुळे रोमछिद्रं बंद व्हायला मदत होते. मॉईश्चरायझर लावताना त्यात दोन थेंब ऍपल सिडर व्हिनेगार घाला. यामुळे त्वचा मुलायम होईल. तसंच रोमछिद्रांचा आकारही कमी होईल.
- दह्यामुळेही रोमछिद्रांचा आकार कमी करता येतो. दह्याचा पॅक लावल्यास मृत त्वचा दूर होते आणि रोमछिद्रं बंद होतात. चेहर्यावर दही लावून पंधरा मिनिटांनी धुवून टाका. दह्यातल्या गुणधर्मांमुळे मुरूमं, पुटकुळ्यांचा त्रासही कमी होतो.
- टोमॅटोचा गर चेहर्याला लावा. साधारण 20 मिनिटांनी धुवून टाका. टोमॅटो बहुगुणी असून या उपायामुळे त्वचेचा काळपटपणा दूर होईल. चेहरा स्वच्छ आणि मुलायम दिसू लागेल.









