ऑस्ट्रेलियाला एकूण 134 धावांची आघाडी, शफिक, अझहर, बाबर यांची अर्धशतके
वृत्तसंस्था/ लाहोर
तिसऱया व शेवटच्या कसोटीच्या तिसऱया दिवशी ऑस्ट्रेलियाने यजमान पाकवर एकूण 134 धावांची आघाडी मिळविली आहे. कर्णधार पॅट कमिन्स व मिशेल स्टार्क यांच्या भेदक माऱयापुढे पाकचा पहिला डाव 268 धावांत आटोपला. त्यानंतर दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱया डावात बिनबाद 11 धावा जमविल्या होत्या.
1 बाद 90 या धावसंख्येवरून पाकने तिसऱया दिवसाच्या खेळास प्रारंभ केला. पण चहापानानंतर त्यांचा डाव नाटय़मयरीत्या कोसळला आणि त्यांनी केवळ 41 धावांत 7 बळी गमविले. त्यातील शेवटच्या चार फलंदाजांनी तर एका धावेचीही भर घातली नाही. कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 56 धावांत 5 तर स्टार्कने 33 धावांत 4 गडी बाद केले. पहिल्या डावात 123 धावांची आघाडी मिळविल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर बिनबाद 11 धावा जमवित ही आघाडी 134 धावांपर्यंत वाढविली. वॉर्नर 4 व ख्वाजा 7 धावांवर खेळत आहेत.
पाकचा फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर अब्दुल्ला शफिक (81) व अझहर अली (78) यांनी 1 बाद 170 अशी भक्कम स्थिती प्राप्त करून दिली होती. दुसऱया सत्रात नाथन लियॉनने शफिकला बाद करून ही जोडी फोडत 150 धावांची भागीदारी संपुष्टात आणली. शफिकने पहिल्या कसोटीत शतक नोंदवल्यानंतर दुसऱया कसोटीत 96 धावांची खेळी केली होती. येथील त्याच्या खेळीत 11 चौकारांचा समावेश होता. दुसऱया नव्या चेंडूवर कमिन्सने अझहरचा परतीचा झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली. चहापानावेळी पाकची स्थिती 3 बाद 227 अशी भक्कम होती. अझहरने आपल्या 94 व्या कसोटीत 74 वी धाव घेत 7000 धावांचा टप्पा पार केला. हा माईलस्टोन गाठणारा पाकचा तो पाचवा फलंदाज आहे. याआधी युनूस खान (10099), जावेद मियांदाद (8832), इंझमाम उल हक (8829), मोहम्मद युसूफ (7530) यांनी सात हजारहून अधिक धावा जमविल्या होत्या.
चहापानानंतर मात्र कमिन्स व स्टार्क यांनी पाकचा डाव झटपट गुंडाळला. पाकने शेवटचे सहा बळी 40 चेंडूत गमविले. कर्णधार बाबर आझम 67 धावा काढून बाद झाला. स्टार्कने बाबर व नसीम शाह यांना बाद करून पाकचा पहिला डाव 268 धावांत संपुष्टात आणला.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया पहिला डाव 391, पाक प.डाव 116.4 षटकांत सर्व बाद 268 ः शफिक 81, इमाम उल हक 11, अझहर अली 7 चौकार, 1 षटकारासह 78, बाबर आझम 6 चौकार, 1 षटकारासह 67, फवाद आलम 13, अवांतर 11, कमिन्स 5-56, स्टार्क 4-33, लियॉन 1-95. ऑस्ट्रेलिया दुसरा डाव 3 षटकांत बिनबाद 11 ः उस्मान ख्वाजा खेळत आहे 7, वॉर्नर खेळत आहे 4.









