प्रतिनिधी/ फलटण
फलटण शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नगर पालिकेच्या माध्यमातून आपण सातत्याने प्रयत्न केले अलिकडे शहर व परिसरात होणारे वाढते औद्योगीकीकरण, व्यापार उद्योगातील वाढ, शिक्षणाच्या वाढत्या सुविधा आणि त्या पाठोपाठ होणारी लोकवस्तीमधील वाढ विचारात घेता शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम करण्याबरोबर त्यामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने कमिन्सच्या सहकार्याने शहरात काही प्रकल्प राबविण्यात येत असून त्या माध्यमातून शहर वासीयांना अधिक दर्जेदार नागरी सुविधा देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत नगर परिषद श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सभागृहात कमिन्स व नगर परिषद यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कमिन्सच्या सोशल कार्पोरेट रिस्पॉन्सिबीलीटी विभागाच्या व्यवस्थापक संगीता गुप्ते, आरोहनम या स्वयंसेवी संस्थेच्या सरोज बडगुजर, नगराध्यक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, नगरसेवक व नगरसेविका, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, वनविभागाचे उप वनसंरक्षक सातारा भारतसिंह हाडा, परिक्षेत्र वनाधिकारी फलटण मारुती निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी.दराडे, उपअभियंता महेश नामदे, नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बोडखे, उपअभियंता योगेश सावंत, फलटण उपविभागाचे उपअभियंता श्रीरंग ठवरे, भूमी अभिलेखच्या उपअधिक्षक श्रीमती शिल्पा जोग, यांच्यासह नगर पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील सार्वजनिक शौचालये, नव्याने रिंगरोडवर उभारण्यात आलेले रस्ता दुभाजक आणि बाणगंगानदी पूल ते गिरवी नाक्यापर्यंत पूर्वी उभारलेले रस्ता दुभाजक यांचे सुशोभिकरण व त्यामध्ये वृक्षारोपण, वनखात्याच्या माध्यमातून गिरवीनाका येथे उभारण्यात आलेल्या बागेचे पुर्नजीवन व सदर बाग नागरिकांसाठी खुली करणे, अधिकारगृह इमारतीमधील बागांचे नुतनीकरण आणि परिसराचे सुशोभिकरण, नगर परिषद कचरा डेपोमध्ये साठलेल्या जुन्या कचर्याची विल्हेवाट आणि नव्याने येणार्या कचर्यापैकी ओल्या कचर्यासाठी असलेल्या कंपोस्ट खडय़ांची दुरुस्ती व प्रत्यक्ष खतनिर्मितीला प्राधान्य, नीरा उजवा कालवा कॉलनी लगतच्या खुल्या जागेत बागेची उभारणी, शहरातून जाणार्या नीरा उजवा कालव्याचे सुशोभिकरण आदी कामे कमिन्स व नगर परिषद यांच्या संयुक्त सहभागाने हाती घेण्याचे नियोजन असल्याची माहिती या बैठकीत मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.
कमिन्सच्या संगीता गुप्ते यांनी शहरातील सार्वजनिक शौचालयांना वीज व पाण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर त्याची नियमित स्वच्छता व दुरुस्ती देखभाल तातडीने करण्याचे मान्य केले त्यावेळी आगामी सप्ताहाभरात एकुण 63 सार्वजनिक शौचालयांपैकी पहिल्या टप्प्यात 15 सार्वजनिक शौचालयांना वीज व पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर अधिकार गृह इमारत परिसरात असलेले सध्याचे स्वच्छता गृहाची दुरुस्ती आणि परिसरात वाहनतळ आणि बागांचे सुशोभीकरण याची पाहणी करुन लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची ग्वाही कमिन्सच्या संगीता गुप्ते यांनी यावेळी दिली.
नगर पालिकेच्या कचरा डेपोच्या ठिकाणी 30 कंपोस्ट खड्डे तयार करण्यात आले असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात 6 खडय़ांची दुरुस्ती व त्याला आच्छादन घालुन प्रत्यक्ष कंपोस्ट खत निर्मिती सुरु करण्याचे तसेच जुन्या कचर्यापैकी प्रायोगिक तत्वावर (पायलट प्रोजेक्ट) उभारण्याची योजना संगीता गुप्ते यांनी मांडून त्याप्रमाणे कचरा विलगीकरण व खतनिर्मितीला सुरुवात करण्याची ग्वाही दिली.
शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या रस्ता दुभाजकांमध्ये वृक्षारोपण व सुशोभिकरण करण्यास सुरुवात करण्यात आली असून गिरवीनाका ते बाणगंगा नदीपूल या परिसरातील रस्ता दुभाजकांमध्ये वृक्षारोपण व सुशोभिकरण हाती घेत असल्याचे यावेळी कमिन्सच्यावतीने सांगण्यात आले.
नीरा उजवा कालवा विभागाच्या कर्मचारी निवासस्थानालगत खुल्या जागेची मालकी पाटबंधारे खात्याची की वनविभागाची या वादात न पडता दोन्ही खात्यांनी या ठिकाणी उत्तम बागबगीचा उभारुन शहर सुशोभिकरणाला प्राधान्य देण्याची योजना स्विकारली असून त्याप्रमाणे कमिन्सच्या माध्यमातून कामाला सुरुवात होणार असल्याचे तसेच शहरातून जाणार्या नीरा उजवा कालव्याच्या पश्चिम बाजूस बाणगंगा नदीपूल (8 मोर्या) ते यशवंतराव चव्हाण हायस्कूलपर्यंतचा भाग वृक्षारोपण आणि सुशोभीकरणाद्वारे दर्जेदार करुन शहराच्या सुशोभीकरणात वाढ करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यासाठी पाटबंधारे खाते व कमिन्सच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शहर स्वच्छता अभियान सध्या वेगात कार्यरत असून शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देत प्रभाग निहाय स्वच्छतेचे नियोजन करण्यात आल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून घंटागाडय़ांचे सुशोभीकरण आणि शहरातील पाणी साठवण टाक्यांची व त्याच्या परिसराची रंगरंगोटी करुन सुशोभिकरणाची योजना स्विकारण्यात आली. त्यापैकी टाक्या व परिसराचे सुशोभीकरण कमीन्सच्या माध्यमातून आणि घंटागाडय़ांच सुशोभीकरण नगर परिषद करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.









