सुकृत मोकाशी/ पुणे
पॅट कमिन्सने अवघ्या 15 चेंडूत 4 चौकार व 6 उत्तुंग षटकारांसह नाबाद 56 धावांची आतषबाजी केल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सचा अक्षरशः एकतर्फी धुव्वा उडवला. पहिल्या षटकापासूनच झगडणाऱया मुंबईने 20 षटकात 4 बाद 161 धावा केल्या. प्रत्युत्तरात कमिन्स-वेंकटेश अय्यरच्या धुवांधार फलंदाजीसमोर मुंबईचा धुव्वा उडत राहिला. केकेआरने 16 षटकात 5 बाद 162 धावांसह दणकेबाज विजय साकारला. मुंबईचा हा यंदाच्या हंगामातील सलग तिसरा पराभव ठरला.
विजयासाठी 162 धावांचे आव्हान असताना अजिंक्य रहाणे (7), श्रेयस अय्यर (10), सॅम बिलिंग्ज (17), नितीश राणा (8), आंद्रे रसेल (11) स्वस्तात बाद झाल्याने मुंबईला अपयशी शृंखला खंडित करण्याची आशाअपेक्षा होती. पण, याचवेळी कमिन्स नावाचे वादळ मुंबई इंडियन्सवर घोंघावले आणि यात मुंबईचा संघ पूर्ण जमीनदोस्त झाला.
कमिन्सने बुमराहसारख्या (0-26) अव्वल गोलंदाजाचा देखील चौकार-षटकारांच्या आतषबाजीसह चांगलाच समाचार घेतला आणि यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माकडे यावर काहीच पर्याय बाकी नव्हता. वेंकटेश अय्यरने कमिन्सला उत्तम साथ देताना 41 चेंडूत नाबाद 50 धावांचे योगदान दिले. त्याच्या या अर्धशतकी खेळीत 6 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला. मुंबईच्या डॅनिएल सॅम्सला 3 षटकात एका बळीसाठी 50 धावा मोजाव्या लागल्या आणि तोच सर्वात महागडा गोलंदाज ठरला.
मुंबईची फलंदाजीत हाराकिरी
प्रारंभी, या लढतीत मुंबईची सुरुवात खराब झाली. मुंबईच्या सहा धावा असतानाच कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. रोहितने केवळ तीन धावा केल्या. त्याला उमेश यादवने वेकटकीपर सॅम बिलिंग्सकरवी झेलबाद केले. बिलिंग्जने मागे पळत जाऊन त्याचा सुरेख झेल घेतला. याही सामन्यात रोहितचे अपयश कायम राहिले. पॉवरप्लेच्या सहा षटकांमध्ये मुंबईला केवळ एक बाद 35 धावा करता आल्या.
रोहित शर्मा बाद झाल्यावर किशन आणि डेव्हाल्ड बेव्हिसने डाव सावरायला सुरुवात केली. पण, मुंबईच्या 45 धावा झाल्या असताना ब्रेव्हिसला वरुण चक्रवर्तीने आपल्या जाळ्यात ओढले. त्याने दोन चौकार आणि दोन षटकारासह 29 धावा काढल्या. मुंबईच्या 10 षटकांमध्ये 2 बाद 54 धावा झाल्या होत्या. धावफलकावर 55 धावा लागल्या असताना इशान किशनही तंबूत परतला. त्याला केवळ 14 धावा करता आल्या. त्याला पॅट कमिन्सने श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. तिलक वर्मा 3 धावांवर असताना अजिंक्य रहाणेने त्याचा झेल सोडला. त्या जीवदानाचा फायदा घेत त्याने 38 धावा केल्या.
या हंगामातील पहिलीच मॅच खेळत असलेल्या सूर्यकुमार यादवने पाच चौकार आणि 2 षटकारासह 52 धावा केल्या. तिलक आणि सूर्यकुमारने 55 बॉलमध्ये 83 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यानंतर आलेल्या केरॉन पोलार्डने आक्रमक खेळ करत 5 चेंडूत तीन षटकारासह नाबाद 22 धावा करीत संघाची धावसंख्या 161 पर्यंत नेली. पॅट कमिन्सने दोन बळी, तर उमेश यादव, वरुण चक्रवर्ती यांनीं प्रत्येकी 1 बळी घेतला.
पुण्यातींल गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना रंगला. कोलकता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स ः 20 षटकात 4 बाद 161 (सुर्यकुमार यादव 36 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारासह 52, तिलक वर्मा 27 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 38, केरॉन पोलार्ड 5 चेंडूत 3 षटकारांसह नाबाद 22, डेव्हाल्ड ब्रेविस 19 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 29, इशान किशन 14. अवांतर 3. पॅट कमिन्स 4 षटकात 2-49, उमेश यादव 4 षटकात 1-25, वरुण चक्रवर्ती 4 षटकात 1-32).
कोलकाता नाईट रायडर्स ः 16 षटकात 5 बाद 162 (पॅट कमिन्स 15 चेंडूत 4 चौकार, 6 षटकारांसह नाबाद 56, वेंकटेश अय्यर 41 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारासह 50, सॅम बिलिंग्ज 17. अवांतर 3. मिल्स 2-38, मुरुगन अश्विन 2-25, डॅनिएल सॅम्स 3 षटकात 1-50).









