चेन्नई / वृत्तसंस्था
तामिळ अभिनेता कमल हासन हे आगामी विधानसभा निवडणूक कोईंबतूर (दक्षिण) मतदारसंघातून लढणार आहेत, अशी माहिती त्यांच्या पक्षाकडून देण्यात आली आहे. त्यांच्या निवडणूक लढण्यासंबंधी साशंकता होती. तथापि, आता ती दूर झाली असून त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे.
काही वषाँपूर्वी त्यांनी मक्कळ निधी मालम नावाचा पक्ष स्थापन केला आहे. हा पक्ष राज्यातील 100 जागा लढविणार असून 43 उमेदवारांची नावे शुक्रवारी घोषित करण्यात आली. या पक्षाने 2019 ची लोकसभा निवडणूक लढविली होती. 37 मतदारसंघांमध्ये त्यांनी उमेदवार उभे केले होते. मात्र ते स्वतः उमेदवारीपासून अलिप्त राहिले होते. आता विधानसभा निवडणूक मात्र त्यांनी जोमाने लढविण्याचा निर्धार केला असून राज्यात आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या चाहत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.









