मध्यप्रदेश पोलिसांकडून सुरक्षाविषयक दक्षता
इंदोर / वृत्तसंस्था
काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘राहुल गांधींना राजीव गांधींकडे पाठवणार’ असा इशारा देतानाच कमलनाथ यांच्यावरही गोळी झाडण्यात येणार असल्याची धमकी पत्रातून देण्यात आली आहे. भारत जोडो यात्रेवर असलेले राहुल गांधी सध्या महाराष्ट्रात आहेत. त्यांचा ताफा 24 नोव्हेंबरला इंदोरला पोहोचणार आहे. याचदरम्यान इंदोरमध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी नुकतेच वीर सावरकर यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच ही धमकी आल्याने त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तसेच त्यांची भारत जोडो यात्रा इंदोरमध्ये पोहोचत असताना अतिदक्षता घ्यावी लागणार आहे.
जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र राहुल गांधींच्या नावाने इंदोरला पाठवण्यात आले आहे. एका दुकानात सापडलेले हे पत्र पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. सदर पत्रात, ‘सावध राहा, नाहीतर आम्ही तुम्हाला बॉम्बने उडवून देऊ’, असे लिहिले आहे. तसेच इंदोरमधील खालसा कॉलेज येथे होणाऱया राहुल गांधींच्या सभेत बॉम्बस्फोट घडवण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. राहुल गांधींना धमकीचे पत्र पाठवणाऱया आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न मध्यप्रदेश पोलीस करत आहेत. 1984 मध्ये संपूर्ण देशात भीषण दंगली उसळल्या. शीखांची कत्तल झाल्यानंतरही त्याविरोधात कोणत्याही पक्षाने आवाज उठवला नसल्याचा मुद्दाही पत्रात उपस्थित करण्यात आला आहे.









