19 किलो वजनाचा सिलिंडर आता 2,253 रुपयांना मिळणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एकीकडे इंधन दरवाढ होत असतानाच नव्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभी देशभरात व्यावसायिक (कमर्शियल) एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर 250 रुपयांनी महाग झाला असून नवे दर तात्काळ लागू झाले आहे. गॅस वितरक कंपन्यांच्या या निर्णयामुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थ आणखी महागण्याची चिन्हे आहेत. सध्या व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले असले तरी घरगुती सिलिंडर दरात मात्र सध्या वाढ न झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे.
या दरवाढीमुळे 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर आता 2,253 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये हा दर 2,087 ऐवजी 2,351 रुपये आणि मुंबईत 1,955 च्या ऐवजी 2,205 रुपयांना मिळणार आहे. तसेच चेन्नईत 2,406 रुपये मोजावे लागणार आहेत. मागील दोन महिन्यात आतापर्यंत 346 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. यापूर्वी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 22 मार्च रोजी 50 रुपयांनी दरवाढ करण्यात आली होती. एलपीजी गॅस आणि इंधन दरवाढीमुळे आता हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर वाढण्याची शक्मयता आहे.
मध्यंतरी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या कालावधीत जवळपास चार महिने गॅस सिलिंडर आणि इंधन दरात वाढ करण्यात आली नव्हती. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचे दरही यादरम्यान स्थिर होते. मात्र निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसातच गॅससह पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. देशातील अनेक शहरांमध्ये घरगुती एलपीजी गॅसचे दर 950 च्या घरात पोहचले. तर, पाटणामध्ये 1000 रुपयांचा दर गाठला आहे.









