संग्राम काटकर/कोल्हापूर
ताराबाई रोड, कपिलतीर्थ मार्केटसमोरील जागेत उभारण्यात येत असलेल्या सात मजली यात्रीनिवास बांधण्याचे काम देवस्थान समितीवरील शासन नियुक्त पदाधिकाऱयांनी नुकतेच रद्द केले आहे. आता तेथे यात्रीनिवासऐवजी अंबाबाईच्या दर्शनासह पर्यटनास कोल्हापुरात येणाऱ्यांसाठी अन्नछत्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रीनिवासअंतर्गत खोल्या बांधण्यासाठी केलेला आराखडा लवकरच महापालिकेकडे दुरुस्ती पाठवून अन्नछत्रासाठी लागणारे हॉल सर्व बाजूंनी सुसज्ज होतील, असा नवा आराखडा तयार करुन घेण्यात येणार आहे.
काही वर्षापूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने महालक्ष्मी बँकेच्या लिलावात रिसन 3147 `ख’ ही जागा खरेदी केली होती. पूर्वी या जागेवर महापालिकेचे वाहनतळासाठी आरक्षण होते. मात्र देवस्थान समितीने आरक्षण उठवून जागेवर मल्टीपर्पज हॉलच बांधण्याचे नियोजन केले. कालांतराने हे ही नियोजन बदलून अंबाबाईचे भाविक व पर्यटकांसाठी 7 मजली यात्रीनिवास उभारण्याचा निर्णय समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी घेतला होता. त्यानुसार सात महिन्यांपूर्वी आराखडा करुन पहिल्या 3 मजल्यांवर वाहनतळ तर उर्वरित चार मजल्यावर शंभर ते सव्वाशे भाविक राहू शकतील अशा 20 खोल्या बांधण्याच्या कामाला प्रारंभही केला. बांधकामासाठी 2 कोटी 97 लाख 63 हजार रुपयांचा निधी मंजूर आहे. या निधीतून सध्या इमारतीच्या फौंडेशनचे कामही सुरु आहे.
असा झाला अन्नछत्र उभारण्याचा निर्णय…
मात्र पाच महिन्यापूर्वी शासनाने देवस्थान समिती बरखास्त केल्याने आता प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी राहूल रेखावार तर सचिव म्हणून शिवराज नाईकवाडे हे समितीचा कारभार पाहत आहेत. त्यांनी छोटÎा आकाराचे यात्रीनिवास बांधणे हे समितीच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही, म्हणून यात्रीनिवासऐवजी अन्नछत्र उभारण्याचा अलीकडेच निर्णय घेतला आहे. त्यांच्याकडून यात्रीनिवासअंतर्गत खोल्या बांधण्यासाठी केलेला आराखडा महापालिकेकडे दुरुस्तीस पाठवून अन्नछत्रासाठी सुसज्ज असे हॉल बांधण्यासंदर्भातील आराखडा बनवून घेण्यात येणार आहे. पुर्वीच्या आराखडÎानुसार मात्र इमारतीच्या पहिल्या तीन मजल्यांवर केल्या जाणाऱया वाहनतळात बदल असणार नाही. वैशिष्ठÎ म्हणजे ज्या ठेकेदाराकडून यात्रीनिवास बांधले जाणार होते, त्यांच्याकडूनच अन्नछत्रासाठीचे हॉल तयार करुन घेण्यात येणार आहेत. एकाचवेळी पाचशेहून अधिक भाविक अन्नछत्राचा लाभ घेतील, असे हॉल असणार आहेत. या हॉलमध्येच पिण्याच्या पाण्याचीही सोय असणार आहे. येत्या वर्षा-दीड वर्षात हॉलचे बांधकाम पूर्ण करुन नियमित अन्नछत्र सुरु केले जाणार आहे.
आचारी आणि वाढपी टेंडरद्वारे निवडणार…
अन्नछत्रामध्ये दिवसाला किमान 4 ते 5 हजार लोक लाभ घेतील, असे जेवण बनवले जाणार आहे. लोक घरी जे जेवण घेतात, ते जेवण अन्नछत्रात असणार आहे. अन्नछत्राचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर टेंडर प्रक्रियेद्वारे जेवण बनवणारे आचारी व वाढपी निवडले जातील, असे देवस्थान समितीचे शिवराज नाईकवाडे यांनी यांनी सांगितले.