बेंगळूर/प्रतिनिधी
कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. पुनीत चाहत्यांमध्ये ‘अप्पू’ या नावाने ओळखला जातो. पुनीलला आज (शुक्रवार) सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला बेंगळूर येथील विक्रम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पुनीतवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. डॉक्टरांची एक टीम त्याच्या देखरेखेसाठी कार्यरत होती. पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी म्हंटले होते. अखेर उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.
दरम्यान, पुनीतला हृदयविकाराचा झटका आल्याचा आणि त्याला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी मिळताच राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे विक्रम रुग्णालयात पुनीतची भेट घेण्यासाठी पोहोचले होते.
विक्रम हॉस्पिटलचे डॉक्टर रंगनाथ नायक यांनी, छातीत दुखू लागल्याने पुनीतला सकाळी साडेअकराच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या उपचारासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. पण त्याची प्रकृती गंभीर आहे. सध्या आम्ही काहीच सांगू शकत नाही. रुग्णालयात दाखल करताना त्याची प्रकृती गंभीर होती. आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली होती.अखेर उपचारादरम्यान पुनीत यांचे निधन झाले आहे.
पुनीत हा दिग्गज अभिनेते राजकुमार आणि पर्वतम्मा यांचा मुलगा आहे. त्याने २९ हून अधिक कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बालकलाकार म्हणून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९८५ मध्ये ‘बेट्टाडा हूवू’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. त्याचबरोबर ‘चालिसुवा मोडागालू’ आणि ‘येराडू नक्षत्रगालू’ मधील अभिनयासाठी त्याला कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता.