‘कोरोना’ मानगुटीवर बसल्यानं हतबल झालेल्या बाजारपेठेला उत्सवाच्या मोसमाची प्रतीक्षा लागून राहिली होती आणि प्रारंभीच्या टप्प्यानं तरी निराशा केलेली नाहीये…‘नवरात्र ते दसरा’ या दहा दिवसांनी टीव्ही, कार्सपासून स्मार्टफोन्सपर्यंतच्या ‘कन्झ्युमर गूड्स’च्या सर्वच विभागांना आनंदानं ‘दांडिया’ खेळण्याची संधी उपलब्ध करून दिलीय…
सणांच्या मोसमातील पहिल्या टप्प्यानं ‘कोरोना’खाली जबरदस्तरीत्या चिरडलेल्या ‘कंझ्युमर गूड्स इंडस्ट्री’ला अक्षरशः आनंदी बनविलंय, तिला उत्साह साजरा करण्याची संधी दिलीय अन् कंपन्यांची उमेद सुद्धा वाढविलीय…‘नवरात्री’ ते ‘दसरा’ या 10 दिवसांत ‘रिटेल’ विक्रीनं गेल्या आर्थिक वर्षातील (2019-20) त्या 10 दिवसांचा विचार केल्यास सहज विजय मिळविलाय आणि ‘डबल-डिजीट’ वृद्धीची जोरदार पद्धतीनं नोंदही केलीय…ग्राहकांचा आत्मविश्वास वाढलाय नि अर्थव्यवस्थेनं पुन्हा एकदा वरच्या दिशेनं प्रवास सुरू केलाय असं म्हटल्यास ते अजिबात चुकीचं ठरणार नाहीये…‘मारूती’, ‘हय़ुंदाई’, ‘सॅमसंग’, ‘एलजी’, ‘सोनी’ अन् ‘लक्झरी रिटेलर्स’ ‘मर्सिडिज-बेंझ’ व ‘डायसन’सारख्या आस्थापनांनी दर्शन घडविलंय ते अफलातून कामगिरीचं…
देश सध्या दिवाळीच्या दिशेनं ‘फॉर्म्युला वन’ चालक हॅमिल्टनच्या गतीनं धावत असल्यामुळं कंपन्यांना स्वप्न दिसू लागलंय ते भल्या मोठय़ा, आकर्षक चित्राचं, प्रसन्न झालेल्या ‘लक्ष्मी’चं…निराश झालेल्या आस्थापनांनी नवरात्र सुरू होण्यापूर्वी नवीन उत्पादनांचा, ऑफर्सचा अक्षरशः पाऊस पाडला, परंतु सध्या अभूतपूर्व विक्रीमुळं त्यांच्यावर वेळ आलीय ती कमी ‘इन्व्हेंटरी’ला तोंड देण्याची. शिवाय गेल्या काही महिन्यांत ‘कोव्हिड-19’मुळं विक्रीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात घसरल्यानं ग्राहकांनी देखील सणांच्या मोसमाला प्रारंभ झाल्यांनतर बाजारपेठांवर, नवीन उत्पादनांवर आक्रमण करण्याची संपूर्ण तयारी केली होती…उदाहरणार्थ ‘एलजी इंडिया’नं म्हटलंय की, ‘टेलिव्हिजन्स’चा विचार केल्यास आम्हाला धक्काच बसला, कारण ग्राहकांनी अनपेक्षितरीत्या हल्लाबोल केला तो बडय़ा आकाराच्या ‘पॅनल्स’वर…
गेल्या आर्थिक वर्षात वाहन उद्योगाला दर्शन घडलं होतं ते 18 टक्क्यांच्या घसरणीचं…‘मारूती-सुझुकी’च्या ताब्यात भारतातील तब्बल 50 टक्के ‘मार्केट’ असून यंदा ‘नवरात्र ते दसरा’ या कालावधीत कंपनीनं ग्राहकांवर ‘95 हजार युनिट्स’चा पाऊस पाडण्यात यश मिळविलंय अन् त्या 10 दिवसांचाच विचार केल्यास आस्थापनानं विक्रम सुद्धा नोंदविलाय. खेरीज ‘मारूती’च्या खात्यात ‘हॅचबॅक्स’ आणि ‘एंट्री-लेव्हल कार्स’ मोठय़ा प्रमाणात असल्यानं त्यांच्यलावर इतरांवर मात करण्यासाठी कष्ट करण्याची वेळ येत नाही…‘हय़ुंदाई’ व ‘किया’ या दक्षिण कोरियामधील कंपन्यांचे वडील एकच…त्यांनाही ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळालाय. ‘किया मोटर्स’नं तब्बल 200 टक्क्यांच्या वृद्धीसह 11 हजारांहून अधिक ‘प्रवासी कार्स’ची विक्री केली, तर ‘हय़ुंदाई’नं ‘ऑफ-रोडर्स’च्या जोरावर 10 दिवसांत 28 हजारांहून जास्त ‘युनिट्स’चाr…
विशेष म्हणजे ‘लक्झरी सेगमेंट’नं देखील ग्राहकांना जाळय़ात पकडण्याचं काम इमाने इतबारे पार पाडलंय…भारतातल्या ‘लक्झरी कार मार्केट’वर राज्य करणाऱया ‘मर्सिडिज-बेंझ’नं 10 दिवसांत चक्क 550 ‘कार्स’च्या विक्रीसह विक्रम नोंदविलाय…‘हीरो मोटो’ व ‘होंडा मोटरसायकल्स अँड स्कूटर इंडिया’ यांना सुद्धा ‘टू-व्हीलर सेगमेंट’मध्ये ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळालाय, परंतु त्यांनी अजूनपर्यंत विक्रीचे ‘आकडे’ व वृद्धीसंबंधीची माहिती जाहीर केलेली नाहीये…‘कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स’चा विचार केल्यास नेहमीप्रमाणं जीवघेण्या स्पर्धेचं दर्शन घडलं ते ‘स्मार्टफोन्स सेगमेंट’मध्ये. नवीन उत्पादनं अन् ग्राहकांना खेचण्याची जोरदार शर्यत यांच्या साहाय्यानं ‘सॅमसंग’, ‘ऍपल’, ‘शाओमी’, ‘वन प्लस’ आणि ‘ओप्पो’ यांनी ‘नवरात्र ते दसरा’दरम्यानच्या कालावधीत अक्षरशः ‘गरबा’ केलाय…‘ऑनलाईन चॅनल्स’मुळं ‘सॅमसंग’च्या खपात गेल्या वर्षीपेक्षा तब्बल 50 टक्के जास्त वाढ पाहायला मिळालीय…‘टीव्ही’च्या विश्वात ‘एलजी’सह ‘सॅमसंग’, ‘सोनी’ नि ‘फिलिप्स’ यांनीही ‘डबल-डिजीट’ वृद्धी नोंदविलीय (‘लार्ज स्क्रीन्स’चं प्रमाण मोठं). आश्चर्यचकीत करणारी बाब म्हणजे ग्राहकांनी महाग कॅमेरे, ‘डिशवॉशर्स’ आणि ‘व्हॅक्यूम क्लीनर्स’ यांच्यावर देखील आक्रमण केलंय…
अन्य एका घडामोडीत दक्षिण कोरियाची जगप्रसिद्ध कंपनी ‘सॅमसंग’साठी आनंदवार्ता आली ती याच कालावधीमध्ये. त्यांनी तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर भारतातील ‘स्मार्टफोन्स’च्या विश्वात पुन्हा एकदा प्रथम स्थान खिशात घातलंय…त्या विख्यात ‘ब्रँड’नं भारतीय बाजारपेठेत अव्वल क्रमांक मिळविलाय तो कट्टर प्रतिस्पर्धी चीनच्या ‘शाओमी’वर मात करून…2020 आर्थिक वर्षातील (2020-21 आर्थिक वर्ष नव्हे) तिसऱया तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) ‘सॅमसंग’नं 24 टक्क्यांसह वरच्या दिशेनं झेप घेतलीय…‘ड्रगन’च्या भूमीवरील कंपनीला आपल्या ‘मार्केट’मध्ये 23 टक्क्यांवर समाधान मानावं लागलंय. ‘शाओमी’नं 2020 च्या दुसऱया तिमाहीत (एप्रिल ते जून) नोंद केली होती ती 26 टक्क्यांची. चिनी आस्थापनाला तोंड द्यावं लागलंय ते लडाखमधील नवी दिल्ली-बीजिंग संघर्षाच्या परिणामांना. त्यांना त्यामुळं सुटे भाग मिळणं कठीण झालंय, ‘सप्लाय चेन’ घसरलीय…
विशेष म्हणजे ‘शाओमी’नं बरोबर दोन वर्षांपूर्वी ‘सॅमसंग’चा पराभव केला होता तो याच तिसऱया तिमाहीत. त्यानंतर ‘व्हिवो’, ‘ओप्पो’, ‘रियलमी’, ‘वन प्लस’ यांनी आक्रमकरीत्या नवीन ‘स्मार्टफोन्स’चं दर्शन भारतीय ग्राहकांना घडवत तसंच मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करत आपलं स्थान मजबूत केलं…विश्लेषकांच्या मते, कदाचित ‘नकारात्मक भावनां’चा धक्का चिनी ‘ब्रँड्स’ना बसलेला असावा. परंतु त्यांना वाटतंय की, 2018 नंतर प्रथमच दुसऱया स्थानावर पोहोचलेल्या ‘शाओमी’ला अडविणं कठीण. ‘सॅमसंग’ला सध्याच्या परिस्थितीचा लाभ मिळालाय अन् आस्थापनानं झेप घेतलीय ती ‘एम’ आणि ‘ए सिरीज’च्या साहाय्यानं. त्याखेरीज त्यांचं ‘ऑनलाईन’ धोरण देखील प्रचंड यशस्वी ठरलंय…भारताला आर्थिक वर्ष 2020-21 च्या तिसऱया तिमाहीत तब्बल 5.3 कोटी ‘स्मार्टफोन्स’नी धडक दिलीय!
जबरदस्त कामगिरी केलेले काही ‘ब्रँड्स’…
- पॅनासॉनिक : भारतात पुनरागमन केलेल्या या ‘ब्रँड’नं गेल्या वर्षाशी तुलना केल्यास चमत्कारच केला…10 दिवसांत ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’ची विक्री 41 टक्क्यांनी, ‘रेफ्रिजरेटर्स’ची 71 टक्क्यांनी, तर ‘वॉशिंग मशिन्स’ची 25 टक्क्यांनी वाढलीय…
- मारूती सुझुकी : ‘नवरात्र ते दसरा’दरम्यानच्या 10 दिवसांत गेल्या वर्षाशी तुलना केल्यास ‘रिटेल’ विक्रीत 20 टक्क्यांची वृद्धी…
- मर्सिडिज-बेंझ : 10 दिवसांत लक्झरी कार्सच्या विक्रीत दुहेरी आकडय़ांत वाढ…
- हय़ुंदाई : ‘क्रेटा’ व ‘व्हेन्यू’ या ‘स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स’मुळं विक्रीत 28 टक्क्यांची दमदार झेप…
- सॅमसंग : ‘स्मार्टफोन्स’च्या ‘बल्ले बल्ले’त मूल्याचा विचार केल्यास विक्रीत 50 टक्के वृद्धी…प्रीमियम उत्पादनांवर ग्राहकांनी हल्लाबोल केल्यानं ‘टीव्ही संच सुद्धा दुकानांतून अक्षरशः गायब…
- एलजी : दूरचित्रवाणी संचांसह वॉशिंग मशिन्स, मायक्रोवेव्ह ओव्हन्स आणि डिशवॉशर्स यांनी सुद्धा जादू दाखविलीय ती ‘डबल डिजीट’ वृद्धीच्या घरात प्रवेश करण्याची…
– राजू प्रभू









