वार्ताहर / कनेडी:
कनेडी बाजारपेठ येथे सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला. ग्रामस्थांना याचे महत्व नसल्याचे रविवारी दिसून आले. रविवार हा आठवडा बाजाराचा दिवस असल्याने ग्रामस्थांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे सध्या सर्वत्र काळजी घेण्यात येत आहे. मात्र, कनेडी येथे एक मीटरच्या अंतराने कोणीही उभे राहिल्याचे दिसत नव्हते. अनेक दुचाकी रस्त्याकडेला उभ्या, तर काहीजण फिरताना दिसत होते. त्यातच बाहेरील व्यापारी कांदे, बटाटे, भाजी विक्रीसाठी आले होते. मच्छी, चिकन खरेदीसाठी सकाळीच लोकांनी गर्दी केली होती. 10 च्या दरम्यान पोलीस व सांगवे पोलीस पाटील यांनी ग्रामस्थांना घरी जाण्याच्या सूचना करण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंची गरज आहे. पण ग्रामस्थांनीही काळजी घेतली पाहिजे. सांगवे ग्रामपंचायत व कनेडी बाजारपेठ व्यापारी मंडळानेही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.









