वृत्तसंस्था/ क्वालालंपूर
भारताने आपल्या कनिष्ठ पुरुष हॉकी विश्वचषकातील मोहिमेची सुऊवात सकारात्मकरीत्या केली असली, तरी आज गुऊवारी येथे ‘क’ गटातील दुसऱ्या सामन्यात स्पेनचा सामना करताना आत्मसंतुष्टतेपासून दूर राहावे लागेल. उपकर्णधार अराईजित सिंग हुंदलने भारताचा तारणहार बनून हॅट्ट्कि केल्याने भारताला मंगळवारी त्यांच्या सलामीच्या सामन्यात कोरियावर 4-2 असा विजय मिळविता आला.
परंतु भारताचे प्रशिक्षक सी. आर. कुमार या कामगिरीवर फारसे समाधानी नसून संघाने अनावश्यक पेनल्टी कॉर्नर देणे टाळले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. सदर सामन्यात कोरियाला सहा पेनल्टी कॉर्नर, तर भारताला फक्त दोन मिळाले. आम्हाला तीन गुण मिळाले याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि हीच सकारात्मक बाजू आहे. परंतु आम्ही पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल स्वीकारले, ज्याकडे आम्ही लक्ष देणे आवश्यक आहे, असे कुमार कोरियाविरुद्धच्या सामन्यानंतर म्हणाले.
2001 (होबार्ट) आणि लखनौ (2016) मध्ये दोनदा स्पर्धा जिंकल्यानंतर भारत या स्पर्धेत चौथ्यांदा पदकाचा मानकरी ठरण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. देशाने 1997 मध्ये इंग्लंडमध्ये स्पर्धा झाली असता रौप्यपदक जिंकले होते. कर्णधार उत्तम सिंग आणि उपकर्णधार हुंदल हे या मोठ्या स्पर्धेतील दोनच असे खेळाडू आहेत ज्यांनी स्पर्धेच्या मागील आवृत्तीत भाग घेतला होता. भुवनेश्वरमध्ये झालेल्या त्या स्पर्धेत भारत चौथ्या स्थानावर राहिला होता आणि कांस्यपदकासाठीच्या प्ले-ऑफ सामन्यात फ्रान्सकडून पराभूत झाला होता.
रॉटरडॅम येथे झालेल्या 2005 च्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा स्पॅनिश संघ हा भारताचा गटातील सर्वांत कठीण प्रतिस्पर्धी आहे. या गटातील अन्य एक संघ कॅनडा आहे. फॉर्म पाहता भारताचे आज स्पेनविऊद्ध पारडे जड राहील. भारताचा शेवटचा साखळी सामना शनिवारी कॅनडाविऊद्ध होणार आहे. ‘अ’ गटात गतविजेते अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, चिली आणि मलेशिया यांचा समावेश आहे, तर ‘ब’ गटात इजिप्त, फ्रान्स, जर्मनी आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. बेल्जियम, नेदरलँड्स, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्या समावेशामुळे ‘ड’ गट हा सर्वांत कठीण आहे. प्रत्येक गटामधील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील.
भारतीयांनी मंगळवारी सुऊवातीपासूनच आक्रमक खेळ केला आणि ते त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतील. परंतु त्यांच्या बचावफळीला प्रतिआक्रमणांपासून सावध राहावे लागेल. त्याचा वापर कोरियन संघाने पेनल्टी कॉर्नर मिळविण्यासाठी केला. स्पेनही भारतीयांविऊद्ध या कमकुवत दुव्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल.









