कडक उन्हात बाहेर पडल्यामुळे त्वचा काळवंडते. त्वचेवर काळपट डाग पडतात. इतकंच नाही, तर त्वचेचा रंगही असमान होतो. हात आणि मानेच्या रंगात फरक दिसून येतो. विशेष प्रसंगासाठी तयार होताना काळपट हात चांगले दिसत नाहीत. आता हातांचं, मानेचं टॅनिंग कसं दूर करायचं असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही बॉडी पॉलिशिंगचा पर्याय निवडू शकता. यामुळे त्वचेची रया परत मिळवता येऊ शकते तसंच त्वचा चमकदार दिसू लागते.
बॉडी पॉलिशिंगमुळे मृत त्वचा आणि काळपटपणा दूर झाल्याने त्वचा उजळ दिसू लागते. बॉडी पॉलिशिंगदरम्यान शरीराला मसाज मिळतो. यामुळे ताणही हलका होतो. पॉलिशिंग केल्यानंतरही आपल्याला काळजी घ्यावी लागते. पॉलिशिंगनंतर काही दिवस तरी रसायनयुक्त लोशन, क्रीम्स वापरू नयेत. साधारण दोन ते तीन दिवस उन्हातही बाहेर पडू नये. उन्हात जाणं गरजेचं असेल तर पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. चेहरा नीट झाकून घ्या. सनस्क्रीन लावायला विसरू नका. जखमा किंवा भाजल्याच्या खुणा असणार्या भागात पॉलिशिंग करू नका.
नियमित पोहायला जाणार्यांनी बॉडी पॉलिशिंग करून घ्यायला हवं. पाण्यातल्या क्लोरिनमुळे त्वचा काळपट होते. पॉलिशिंगमुळे त्वचेला चमक मिळते. पाठीवर पुरळ उठल्यानंतर पडणारे डाग वाईट दिसतात. हे डाग पुसट करण्यासाठी स्क्रीन लाईटनिंग बॉडी मसाज करू शकता. लग्नप्रसंगी छान दिसण्यासाठी बॉडी पॉलिशिंग करून घेता येईल.