सातारा / प्रतिनिधी :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. नियमांचे पालन न केल्यास सामान्य नागरिकांवर जशी कारवाई होते, तशी नेत्यांवरही व्हायला हवी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सरकारने घालून दिलेले नियम पाळले पाहिजेत. मात्र, ते नियम पाळत नाहीत.कदाचित त्यांना मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळायचा नसेल, अशी फिरकी केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी मास्क न वापरणाऱ्या नेत्यांची घेतली.
आठवले आज सातारा दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. देशातील 60 ते 70 टक्के केसेस या महाराष्ट्रामध्येच आहेत. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन काटेकोरपणे होणे गरजेचे आहे. राज ठाकरे हे मनसेचे संस्थापक आहेत. त्यांनी मास्क घातला पाहिजे. कदाचित त्यांना मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळायचा नसेल. किंवा त्यांना कोरोनाची चिंता नसेल. पण त्याचा इतरांना त्रास होऊ शकतो.
कृषी कायदे शेतकरी हिताचे
केंद्र सरकारने आणलेले तिन्ही कृषी कायदे शेतकरी हिताचेच आहेत. त्यामुळे दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या नावाने सुरु असलेले आंदोलन थांबावे, ही आमची भूमिका आहे. कायदा मागे घेण्यासाठी हट्ट करणे चुकीचे आहे. त्याऐवजी दुरुस्ती करा अशी मागणी केली असती तर ठिक होते. लोकांना त्रास देणारे हे आंदोलन आहे. न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आंदोलन थांबले पाहिजे होते पण आजही ते सुरुच आहे. प्रत्येक भूमिहीन कुटुंबाला 5 एकर जमीन द्यावी, यासाठी गायरान जमीन किंवा जिथे जमीन नसेल तिथे विकत घेऊन द्यावी अशी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी होत आहे. शेतकऱ्यांना कोणीही भूमिहिन करणार नाही. चुकीचा प्रचार केला गेला. त्यामुळे शेतकयांनी आता आपली भूमिका बदलावी.