खड्डेमय रस्ते, कचरा, दुर्गंधीमुळे ओंगळवाणे चित्र
प्रतिनिधी /पणजी
राजधानीतील कदंब महामंडळाच्या बस स्थानकाची पार दूरवस्था झाली असून जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे सध्या या परिसरात सर्वत्र खड्डे आणि कचरा पसरलेला आहे. या स्थानकावर उतरणाऱया प्रवाशांचे स्वागत अत्यंत लाजिरवाण्या पद्धतीने होत असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते आयरीश रॉड्रिगीश यांनी केली आहे.
त्याचबरोबर राजधानीत येणाऱयांसाठीही हा परिसर आरोग्य आणि पर्यावरणीय धोक्मयांबरोबरच गैरसोयीचाही ठरत आहे. हा प्रकार केवळ राजधानीपूरताच मर्यादीत नाही. राज्याच्या अन्य भागात असलेल्या कदंब स्थानकांचीही परिस्थिती अशीच असून देखरेख, देखभालीअभावी तेथेही ओंगळवाणे चित्र निर्माण झाले आहे.
पणजी बस स्थानकाचे तर काही ठिकाणी अक्षरशः तुकडे पडत चालले आहेत. ही परिस्थिती पाहिल्यास सध्या ते स्थानक दुरुस्ती न करण्याएवढय़ा स्थितीत पोहोचले आहे. त्यामुळे ते पूर्णतः पाडूनच त्याठिकाणी नवे अत्याधुनिक बस स्थानक निर्माण करण्याची गरज आहे.
दरम्यान, कदंब बसस्थानकाच्या परिसरातील रस्त्यांचीही अत्यंत दयनीय अवस्था बनली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे खास करून दुचाकी चालकांसाठी हे रस्ते धोकादायक ठरत आहेत. तीन वर्षांपूर्वी मांडवीवरील अटल सेतूचे उद्घाटन झाले होते. परंतु त्याच्या शहरातील भागात, बसस्थानक परिसरात बहुतेक सर्व खांबाखाली मोठय़ा प्रमाणात कचरा साचला असून त्यामुळे ओंगळवाणे चित्र निर्माण होत आहे.
अटल सेतू प्रकल्पाची देखरेख करणाऱया राज्य साधनसुविधा महामंडळाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अटल सेतूच्या बांधकाम कंत्राटदारावर अद्याप कोणतीही कारवाई का केली नाही, असा सवाल ऍड. रॉड्रिक्स यांनी उपस्थित केला आहे.









