वार्ताहर / गोकुळ शिरगाव
कणेरीवाडी (ता. करवीर) येथील जयहिंद ढाब्याजवळ जेवणासाठी थांबलेल्या ट्रकच्या केबिनमधून ३३ लाख २८ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबवली. सदर ट्रक मधून बकरी खरेदी करण्यासाठी बंगलुरू वरुन शिर्डी अहमदनगर येथील धनगरांकडील बकरी खरेदीसाठी निघाले होते. दरम्यान घटनेची फिर्याद ट्रक मालक महंमद सिकंदर कुरेशी (वय ४२ राहणार न्यू संतन डी. एस . गुरुप्पन पल्लय. बी एस रोड, बेंगलुरू, कर्नाटक) यांनी गोकुळ शिरगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान आरोपींच्या तपासासाठी पथके रवाना झाले असून ट्रक थांबलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्याच्या आधारे तपासाची चक्रे गतिमान झाली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी बेंगलोर वरून शिर्डी अहमदनगरला दोन ट्रक मधून एकूण नऊ खाटीक व्यवसायिक एकत्रित बकरी खरेदी करण्यासाठी निघाले होते . मोठ्या प्रमाणात बकरी खरेदी करण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असल्याने सर्व व्यापाऱ्यांनी आपली रक्कम एकत्रित केबिन मधील मागील सीटच्या खाली ठेवली होती . परंतु मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास जेवणासाठी दोन्ही ट्रकमधील नऊ व्यक्ती थांबल्या व ट्रॅकची सर्व दारे, काचा व खिडक्या व्यवस्थित बंद करून जेवणासाठी गेले असता ट्रक (क्र. के ए ५१ ए.बी.३२०५) या ट्रक केबिन मधील मागच्या सीट खाली ठेवलेले ३२लाख २८ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले.
सदर घटनेची वर्दी मिळताच गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण घटनास्थळी दाखल झाले व या घटनेची ची माहिती तात्काळ वरिष्ठांना दिली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे व डीवायएसपी प्रशांत अमृतकर हे बुधवारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. यावेळी श्वानपथक पाचारण करण्यात आले होते परंतु श्वान तेथेच घुटमळत राहिले. यासंदर्भात अद्याप कोणतेही धागेदोरे सापडले नसुन तपासासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.
यापूर्वीसुद्धा याच ठिकाणी दोन ट्रॅव्हल्स बस मधून गेल्या दोन वर्षापूर्वी एक कोटीचे सोने दीड, कोटीचे सोने अशा दोन वेळा मोठ्या चोर्या अशाच पद्धतीच्या झाल्या होत्या त्यामुळे हा स्पॉट चोरीच आहे का ?