पाठपुराव्यासाठी बुडाच्या अधिकाऱयांचा बेंगळूर दौरा : शेतकऱयांची दिशाभूल
प्रतिनिधी / बेळगाव
कणबर्गी वसाहत योजना राबविण्यासाठी भू-संपादनाची प्रक्रिया पूर्ण करून वर्ष उलटले. पण अद्यापही ही योजना मार्गी लागली नाही. राज्य शासनाकडे बुडाच्या अधिकाऱयांकडून व्यवस्थित आणि पूरक माहिती दिली जात नसल्याने योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. पण मंजुरी मिळणार असल्याचे सांगून शेतकऱयांची दिशाभूल करण्यात येत आहे.
कणबर्गी परिसरात वसाहत योजना राबविण्यासाठी 2007 मध्ये भू-संपादनाची नोटीस बजावण्यात आली होती. 50ः50 तत्त्वानुसार नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन बुडाच्या अधिकाऱयांनी दिल्याने 110 एकर जमीन मालकांनी योजना राबविण्यास संमती दिली आहे. पिकावू शेतजमीन असल्याने काही शेतकऱयांनी योजना राबविण्यास आक्षेप घेऊन न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे न्यायप्रविष्ट जागा वगळून भू-संपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. बुडाने एक वर्षापूर्वी भू-संपादनाची प्रक्रिया पूर्ण करून जागेचा ताबा घेतला होता. वर्षभरात योजना राबवून नुकसानभरपाई अंतर्गत भूखंड देण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. पण वर्ष उलटले तरी योजना राबविण्यासाठी व विकासकामे करण्यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आली नाही.
प्रस्ताव मंजुरीविना धूळखात
नुकसानभरपाई द्या, अन्यथा आमच्या जमिनी परत करा, अशी मागणी संमती दिलेल्या शेतकऱयांनी बुडाकडे केली होती. लवकरच योजना राबविण्यात येणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले होते. पण प्रत्यक्षात योजनेला शासनाकडून मंजुरी दिली नाही. योजनेच्या प्रस्तावाला मंजुरीसाठी आवश्यक माहिती देणे गरजेचे आहे. पण व्यवस्थित व पूरक माहिती दिली जात नसल्याने वारंवार विविध माहितींची विचारणा राज्य शासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे कणबर्गी योजनेचा प्रस्ताव मंजुरीविना धूळखात पडला आहे.
शेतकऱयांची दिशाभूल करण्याचा प्रकार
प्रस्ताव मंजुरीसाठी कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय चर्चेला घ्यावा याचा पाठपुरावा करण्यासाठी बुडा आयुक्त, नगरयोजना अधिकारी आणि साहाय्यक कार्यकारी अभियंते बेंगळूर दौऱयावर गेले होते. पण कणबर्गी योजनेला मंजुरी मिळाली नाही. बुडाच्या अधिकाऱयांकडून व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याने हा प्रस्ताव रखडला आहे. योजनेला मंजुरी मिळणार असल्याचे सांगून शेतकऱयांची दिशाभूल करण्याचा प्रकार बुडा अधिकाऱयांकडून करण्यात येत असल्याची टीका शेतकरी करीत आहेत.









