बुडाची कारवाई : बुडाच्या अधिकाऱयांकडून इमारतधारकांना सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
कणबर्गी येथील वसाहत योजना क्र. 61 ची वसाहत निर्माण करण्यासाठी बुडाने सपाटीकरणाचे काम सुरू केले आहे. मात्र या योजनेंतर्गत येणाऱया जागेमध्ये काहींनी बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे सदर बांधकाम थांबविण्याची कारवाई बुडातर्फे करण्यात आली. तसेच अशा प्रकारची अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचा सपाटा हाती घेतला आहे.
कणबर्गी परिसरातील 165 एकर शेतजमिनीत वसाहत योजना राबविण्याचा बुडाचा प्रस्ताव आहे. सदर योजना राबविण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. तसेच हे काम सुरू करण्यासाठी बुडाच्या बैठकीत हिरवा कंदील दर्शविला आहे. त्यामुळे कणबर्गी परिसरातील संपादित केलेल्या जागेचे सपाटीकरण करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र न्यायप्रविष्ट असलेल्या जागेचे सपाटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले नाही. तसेच या योजनेंतर्गत असलेल्या जमिनीवर बांधलेली घरे वगळण्यात आली आहेत. मात्र योजनेचे काम सुरू असतानाच काहींनी अनधिकृतरित्या घरे बांधण्याचे काम सुरू केले आहे. बुडाच्या अखत्यारित येणाऱया जागेत घरे बांधू नयेत व लेआऊट करू नयेत, अशी सूचना बुडातर्फे केली होती. पण या सूचनेकडे दुर्लक्ष करून खासगी लेआऊट व अनधिकृतरित्या घरे बांधण्याचे काम सुरू आहे. ही माहिती बुडाच्या अधिकाऱयांना समजल्याने तातडीने धाव घेऊन इमारतधारकांना सूचना केली होती. पण या सूचनेकडे दुर्लक्ष करून बांधकाम हाती घेण्यात आले होते. बुडाच्या अधिकाऱयांनी सदर बांधकाम बंद पाडले. तसेच बांधकाम करू नये, अशी सूचना केली आहे. कारवाईवेळी बुडाचे अधिकारी उपस्थित होते.









