वार्ताहर / सांबरा
कणबर्गी येथे पाणीपुरवठा मंडळाकडून दर चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण गावाला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. एकतर अपुरा पाणीपुरवठा व अशातच पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात आली आहे. तरी संबंधित अधिकाऱयांनी दर दोन दिवसाआड पाणीपुरवठा करून गैरसोय दूर करावी, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.
गावामध्ये महानगरपालिका अस्तित्वात आली, त्यावेळी पाण्याच्या दगडी टाक्मया बांधण्यात आल्या होत्या. सदर टाक्मयांना सध्या गळती लागली आहे. तसेच 1990 ते 2000 साली माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या कार्यकाळामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये पाच ते सहा सार्वजनिक नळ बसविण्यात आले होते. त्यातील काही नळ सध्या नादुरुस्त झाले आहेत. पाणीपुरवठा मंडळाने सार्वजनिक नळ दुरुस्त करण्याचे सोडून घरोघरी नळ कनेक्शन घ्या, असा नागरिकांना तगादा लावला आहे. श्रीमंत लोक एखाद्या वेळेला घरगुती नळ कनेक्शन घेतील, मात्र गरिबांचे काय, असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे. यासाठी आता वरि÷ अधिकाऱयांनीच गावातील पाणी समस्येची पाहणी करून सार्वजनिक नळांची दुरुस्ती करावी व दर दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पाणीपुरवठा मंडळाने दर दोन महिन्याला 280 रुपयांवरून 350 रुपये पाणीपट्टी केली आहे. नागरिकांना 70 रुपये जास्त मोजावे लागत असले तरी गावाला अपुरा पाणीपुरवठा होत आहे. नादुरुस्त झालेले सार्वजनिक नळ दुरुस्ती करण्याकडे पाणीपुरवठा मंडळाने पाठ फिरविली आहे. सार्वजनिक नळांची संख्या कमी करून घरोघरी नळ कनेक्शन घेण्याचा तगादा लावण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून प्रत्येक गल्लीत किमान तीन-चार सार्वजनिक नळही ठेवा व घरोघरी नळ कनेक्शनही द्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे..









