प्रतिनिधी / बेळगाव
कणबर्गी, शांतीनगर गल्ली परिसरातून जाणाऱया छकडीगाडी मार्गावर संरक्षक भिंत बांधल्याने शेतकऱयांना ये-जा करण्याचा मार्ग बंद झाला आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रार करण्यात आल्याने मंगळवारी या रस्त्याची पाहणी मनपा अधिकाऱयांनी केली. त्यामुळे हा रस्ता खुला करावा, या मागणीसाठी श्री सिद्धेश्वर शेतकरी संघटनेच्यावतीने बुधवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन पाठपुरावा केला.
या रस्त्यावर मालकी हक्क सांगून संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. बुडाच्या नकाशाप्रमाणे या ठिकाणी छकडीगाडी मार्ग आहे. तरीदेखील हा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेने महापालिकेला निवेदन देऊन रस्ता खुला करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी मनपा अभियंत्यांनी रस्त्याची पाहणी करून माहिती घेतली. त्यामुळे शेतकरी संघटनेने बुधवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन पाहणीबाबत आढावा घेतला. सदर रस्त्याची जागा खासगी असल्याचे पत्र ग्राम तलाठय़ांनी दिले होते. त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आल्याचे चौकशीवेळी आढळून आले आहे. तरीही आवश्यक माहिती घेण्यात येत असून सर्व कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम सुरू असल्याचे महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱयांना सांगितले.
सदर जागेवर रस्ता असून पूर्वीच्या नकाशामध्ये तशी नोंद आहे. तसेच रस्त्यावरून ग्रामस्थ ये-जा करीत होते. जनावरे घेऊन जाणे आणि छकडीगाडी घेऊन या रस्त्याने नागरिक शेतावर जात असत. त्यामुळे रस्त्याचा वापर पूर्वीपासून करण्यात येत होता. पण अलीकडेच नकाशामध्ये बदल करून जागेवर संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण जागेची पाहणी करून मोजमाप करण्यात यावे, कणबर्गीवासियांना रस्ता खुला करून द्यावा, अशी विनंती श्री सिद्धेश्वर शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली.
यावेळी शेतकरी संघटनेचे बबन मालाई, प्रकाश नाईक, भरमा कोडकर, ओमाणी मालाई, पिराजी मुतगेकर, अनिल कोडकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.









