प्रतिनिधी/ बेळगाव
पावसाळय़ात पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी महानगरपालिकेने शहरातील नाला स्वच्छता मोहीम राबविली आहे. मात्र, उपनगरांतील नाला स्वच्छतेकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. परिणामी कणबर्गी परिसरातील नाला स्वच्छता मोहीम राबविण्यात आली नसल्याने झाडेझुडपे जैसे थे आहेत. त्यामुळे यंदाही घरांमध्ये पाणी घुसणार का? अशी भीती निर्माण झाली असून, तांबडा नाल्याची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
मागील वषी पावसामुळे नाले तुडुंब भरून रस्त्यावर पाणी साचले होते. काही ठिकाणी नाल्यांची स्वच्छता व्यवस्थित झाली नसल्यामुळे घरांमध्ये पाणी शिरले होते. यंदाही तशी परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता महानगरपालिकेने नाला स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी आटापिटा चालविला आहे. मात्र, उपनगर आणि कणबर्गीसारख्या परिसरात नाला स्वच्छता मोहीम राबविण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. कणबर्गी परिसरातून 3 नाले वाहतात. काही नाल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. काही नाले बांधकाम करणे आवश्यक आहे. बांधकाम नसलेल्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. नाल्यांची स्वच्छता करण्यात आली नसल्याने झाडाझुडपांनी नाले तुडुंब भरले आहेत. मागील वषी पावसाळय़ात नाल्यांचे पाणी बसवेश्वर गल्ली, मठ गल्ली आणि गोकाक रोड परिसरातील काही घरांमध्ये शिरले होते. त्यामुळे येथून वाहणाऱया तांबडा नाल्याची स्वच्छता करणे गरजेचे आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या हा नाला स्वच्छ करून खबरदारीच्या उपाययोजना राबविण्याची गरज आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नाल्यांची पाहणी करून स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
नाल्यांच्या काठावर बफरझोनच्या जागेत रस्ते घालून काही शेत जमिनीमध्ये भूखंड घालण्यात आले आहेत. सध्या नाल्यांच्या काठावरील जागेचा उपयोग रस्ता म्हणून केला जात आहे. पण भविष्यात नाला बांधकाम झाल्यास रस्ता अरुंद होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे रस्त्यासाठी काहींनी अतिक्रमण केल्याचे दिसून आले आहे. सदर नाल्यांची पाहणी करून बांधकाम करण्याच्यादृष्टीने निधीची तरतूद करावी व पावसाळय़ानंतर बांधकाम सुरू करावे, अशी मागणी होत आहे.









