आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी झुकायचं नसतं हे नाशिकच्या सविता लभाडेने दाखवून दिलं आहे. पतीच्या निधनामुळे सवितावर दुःखाचा डोंगर कोसळला. पदरात दोन मुलं आणि डोक्यावर सात लाख रुपयांचं कर्ज होतं.पण ती खचली नाही. सविताने भाज्या पिकवायला सुरूवात केली. मसाले तयार करण्याचा उद्योग सुरू केला. किराणा दुकान थाटलं. पतीने घेतलेलं कर्ज
फेडलं आणि मुलांना स्वतःच्या पायांवर उभं केलं. सविताने दाखवलेली कणखर वृत्ती वाखाणण्याजोगी आहे.
मुलगी शिकली, प्रगती झाली असं म्हटलं जातं. एक मुलगी, महिला संपूर्ण कुटुंबाला एका धाग्यात बांधून ठेवते. कुटुंबाचा संपूर्ण भार आपल्या खांद्यांवर घेते. पतीच्या पश्चात कुटुंबाचा गाडा हाकायची वेळ आली तर ती रणरागिणी होते. सर्वस्व पणाला लावून कुटुंबाचं पोट भरते. नाशिकच्या सविता लभाडेही अशाच धीरोदात्त महिला. 2008 मध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. दोन लहानगी मुलं आणि सासूसासर्यांचं पोट भरण्यासोबतच पतीने घेतलेलं सात लाख रुपयांचं कर्ज फेडण्याचं आव्हान त्यांना पेलायचं होतं. सविता यांना सात लाख रुपयांच्या कर्जाची अजिबात कल्पना नव्हती. पतीच्या निधनानंतर साधारण वर्षभराने बँकेचे कर्मचारी त्यांचं दार ठोठावू लागले. कर्जाच्या परतफेडीबाबत नोटीसा येऊ लागल्या. यामुळे त्या पुरत्या गोंधळून गेल्या. या आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना सोन्याची चेन विकावी लागली. त्यावेळी त्यांचा मुलगा धीरज चौथीत तर मुलगी साधना दुसरीत होती. या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक तजवीज करणं भाग होतं. लभाडे कुटुंबाकडे अडीच एकर द्राक्षाची शेती होती. मात्र या शेतीद्वारे वर्षातून एकदाच उत्पन्न मिळायचं. आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या सविता यांना द्राक्षाच्या शेतीचं तंत्र माहीत नव्हतं. मग त्यांनी या जमिनीवर भाज्यांची लागवड करायला सुरूवात केली. मात्र भाज्या विकून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं. महिन्याला कसेबसे दहा हजार रुपये मिळायचे. यातून कुटुंबाचा खर्च भागवणं, कर्जाचे हप्ते फेडणं शक्य होत नव्हतं. मग कुणीतरी मसाले विकण्याचा व्यवसाय करण्याबाबत सुचवलं. यासाठी त्यांना 65 हजार रुपयांचं मसाले कुटण्याचं यंत्र विकत घ्यावं लागलं. बचतीच्या पैशातून आणि सोनं विकून त्यांनी 65 हजार रुपयांचं यंत्र खरेदी केलं. मसाले तयार करण्याच्या व्यवसायातून सविता यांना महिना 50 हजार रुपये मिळू लागले. यामुळे आयुष्य थोडंफार सुसह्य होऊ लागलं. भाज्यांच्या शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नसल्यामुळे सविता यांनी सोयाबीन तसंच गव्हाची लागवड सुरू केली. जवळपास सहा वर्षांच्या संघर्षानंतर 2014 मध्ये सविता यांचं सगळं कर्ज फिटलं आणि त्यांच्या खांद्यांवरचं खूप मोठं ओझं कमी झालं. 2015 उजाडेपर्यंत सविता यांच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली. त्या महिन्याला 60 हजार रुपये कमवू लागल्या. फेब्रुवारी ते जुलै हा मसाले तयार करण्याचा आणि साठवण्याचा हंगाम. या काळात सविता मसाले तयार करून विकत असत. उर्वरित महिन्यांमध्ये नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी त्यांनी किराणा दुकानही सुरू केलं. मधल्या काळात त्यांनी ऊसाची लागवड सुरू केली. यंदाच्या हंगामात ऊस लागवडीतून त्यांनी 54 हजार रुपये उत्पन्न मिळवलं. पतीच्या निधनानंतर असंख्य आव्हानं समोर उभी असतानाही सविता खचल्या नाहीत. त्यांची अर्थार्जनाच्या विविध पर्यायांची चाचपणी केली. दिवस-रात्र मेहनत घेतली. संघर्ष केला. या संघर्षाची गोड फळं त्यांना मिळाली. शिवाय आता त्यांची मुलंही शिकून स्थिरस्थावर होत आहेत. मुलगा धीरज इलेक्ट्रॉनिक्समध्ये कारकिर्द घडवत आहे तर साधना राज्य पोलीस सेवा प्रवेश परीक्षेची तयारी करत आहे. जिद्द आणि मेहनतीच्या बळावर सर्वसामान्य महिला आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ ठरू शकते, हेच सविता लभाडे यांनी दाखवून दिलं आहे









