शिवसेनेचे न. पं. गटनेते सुशांत नाईक यांची टीका : नगराध्यक्ष खुर्चीवर नाहीत, न. पं. ची गाडी जप्त, मुख्याधिकारी येत नाहीत! : नगर पंचायतीवर प्रशासक नेमण्याची मागणी करणार!
वार्ताहर / कणकवली:
राज्यात पोलीस कोरोना विरोधातील लढय़ात रस्त्यावर असताना पोलिसांच्या वर्दीला आव्हान देण्याचे काम कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. कणकवलीच्यादृष्टीने ही लाजिरवाणी बाब आहे. कोरोनाच्या लढय़ात जिल्हा प्रशासनाला साथ देण्याची गरज असताना नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल झाल्याने ते आपल्या खुर्चीवर नाहीत. नगराध्यक्षांच्या वागण्यामुळे न. पं.ची गाडीही जप्त करण्याची नामुष्की ओढवली आहे. मुख्याधिकारीही न. पं.मध्ये येत नाहीत. त्यामुळे कणकवली न. पं.चा कारभार सध्या वाऱयावर असल्याने जिल्हाधिकाऱयांनी न. पं.वर प्रशासक नेमावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना न. पं. गटनेते सुशांत नाईक यांनी दिली.
येथील ‘विजय भवन’मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत नाईक बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर, सचिन सावंत, सुजीत जाधव, प्रसाद अंधारी आदी उपस्थित होते.
नगराध्यक्षपदाची खुर्चीही जप्त होईल!
नाईक म्हणाले, कणकवली न. पं.ची गाडी पोलिसांनी जप्त करणे ही शहरवासियांच्यादृष्टीने भूषणावह नाही. जिल्हय़ात पहिल्यांदाच गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी नगरपालिकेची गाडी जप्त करण्याचा प्रकार घडला आहे. नगराध्यक्षांची वागणूक अशीच राहिली, तर भविष्यात नगराध्यक्ष पदाची खुर्ची जप्त करण्याची वेळ येईल. कणकवलीत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी येणाऱया अनेकांची वाहने पोलिसांनी जप्त केली. अनेकांवर दंड आकारणी करण्यात आली. नगराध्यक्षांच्या चुकीच्या वागण्यामुळेच पोलिसांनी ही कारवाई केल्याची शहरवासियांची भावना आहे. त्यामुळे प्रशासनाने आता सर्वसामान्यांच्या गाडय़ा अगोदर सोडाव्यात व नंतरच न. पं.ची प्रशासकीय गाडी सोडावी. सर्वसामान्यांना एक व राजकारण्यांना एक न्याय नको.
नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा!
नार्वेकर म्हणाले, शहराच्या प्रथम नागरिकाने पोलिसांचे त्यांच्या कामासाठी अभिनंदन करायला हवे होते. मात्र, प्रथम नागरिकाकडून पोलिसांना धाकात ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वागण्याबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी राजीनामा द्यावा. शैलेश भोगले म्हणाले, नगराध्यक्षांच्या हातून गुन्हा घडल्यानंतर पोलिसांना सहकार्य म्हणून त्यांनी स्वत: अटक व्हायला हवे होते. मात्र, नगराध्यक्षांनी पळपुटेपणाची भूमिका घेत पोलिसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत शहरवासियांचा नगराध्यक्षांनी विश्वासघात केला.
डीवायएसपींच्या बैठकीला हजर कसे?
कन्हैया पारकर म्हणाले, गुन्हेगार असताना नगराध्यक्ष नलावडे यांनी न. पं.च्या गाडीचा वापर केला. एवढय़ावरच न थांबता, त्यांनी प्रांताधिकारी, डीवायएसपी यांच्यासोबत बैठकीलाही उपस्थिती दर्शविली. त्यामुळे माझे कुणीच काही करू शकत नाही, हे नगराध्यक्षांनी दाखविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना धमकी दिल्याप्रकरणी संशयित फरार असताना न. पं.च्या गाडीचा वापर केला, अशी नोंद न. पं.च्या गाडीच्या चालकाने पोलिसांत दिली आहे. या सर्व बाबींवर प्रशासनाचे लक्ष असण्याची गरज होती. कणकवली शहराचा नागरिक म्हणून नगराध्यक्षांच्या या गुन्हेगारी भूमिकेचा मी निषेध करतो.









