हल्लेखोर युवक पसार
कणकवली / वार्ताहर-
गैरसमजातून झालेल्या वादावादीत उत्तम चंद्रकांत पुजारे (३३, कणकवलीत – जळकेवाडी) याच्यावर अन्य युवकाने थेट चाकू हल्ला केला. सुदैवाने चाकुचे वार पोटात न बसता डाव्या कानानजीक, डाव्या दंडावर बसल्याने उत्तम बचावला. ही घटना उत्तम याच्या राहत्या घरानजीक मंगळवारी सकाळी १०.३० वा. सुमारास घडली. घटनेनंतर हल्लेखोर युवकाने पळ काढला. उत्तम याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयातून पोलीस स्टेशनला जात त्याने हल्लेखोर युवकाविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका नाजूक प्रकरणातील गैरसमजूतीतून हा प्रकार घडल्याचे पोलिसी सुत्रांनी सांगितले.









