प्रतिनिधी / कणकवली
हळदीकुंकू म्हणजे सुहासिनींचा उत्सव.अशी परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे.अशा उत्सवांमध्ये ज्या महिलांचा पती आता या जगात त्यांच्यासोबत नाही अशा महिलांना स्थान दिले जात नाही.ही रूढी–परंपरा कुठेतरी थांबण्याचा प्रयत्न करण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या कणकवली शहरातील सहयोगीनी सेवा मंडळ मार्फत विधवा महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला गेला आणि त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला ज्याच्यातून यां महिलांच्या विचारला नवी दिशा मिळाली आहे.
ज्या विधवा महिला पतीच्या निधनानंतर समर्थपणे सर्व संसाराच्या जबाबदाऱ्या पार पडतात त्यांना हा सन्मान का मिळू नये ? त्यांनीही समाजामध्ये स्वाभीमानाने वावरावं, त्यांचाही आदर सन्मान समाजामध्ये व्हावा या उद्देशाने मंडळाच्या अध्यक्ष दिपा दिलीप सरुडकर, उपाध्यक्ष स्वाती संतोष पोयेकर, सचिव शुभांगी सुभाष उबाळे, सहसचिव अन्नपूर्णा महेश आवटी, खजिनदार प्राची प्रवीण कर्पे, आणि इतर सदस्य यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला गेला.
आजच्या बदलत्या युगामध्ये ज्याप्रमाणे आपली खाण्यापिण्याची, राहणीमानाची कपडे बदलण्याची पद्धत बदलत आहे.त्याचप्रमाणे कुठेतरी लोकांची मानसिकताही बदलण्याची आज गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून आम्हीही हा उपक्रम राबविला असे सौ सरुडकर यांनी सांगितले. असेच सेवाभावी उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून भविष्यात राबविले जाणार आहेत. या मंडळाच्या या उपक्रमाला अनेकांची साथ उत्तम मिळाली, त्याचप्रमाणे पुढील उपक्रमाला ही ती मिळेल असा विश्वास या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर या हळदीकुंकू समारंभ सहभागी झालेल्या महिलांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.









