पुन्हा चोऱयांची मालिका : चार फ्लॅट, तीन घरे चोरटय़ांनी फोडली : बंद घरे लक्ष्य
दीड लाखाच्या रोकडीसह चांदीच्या भांडय़ांची चोरी
कणकवली:
कणकवली शहरात पुन्हा एकदा चोऱयांचे सत्र सुरू झाले आहे. शहरातील वरचीवाडी येथील अपार्टमेंटमध्ये तब्बल तीन लाखांचे दागिने चोरीस गेल्याच्या घटनेला चोवीस तास उलटत नाहीत, तोच चोरटय़ांनी गुरुवारी रात्री शहरातीलच जळकेवाडी येथे दोन वेगवेगळय़ा इमारतींमधील मिळून चार फ्लॅट व एक बंगला फोडला. यात दोन फ्लॅटमधून मिळून जवळपास दिड लाखांची रोकड व चांदीची भांडी चोरीस गेली आहेत. दरम्यान, नाथ पै नगर येथेही दोन घरे फोडल्याचे उशिरा समजून आले.
या घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्या. सर्व ठिकाणी चोरटय़ांनी कुलपाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केल्याचे दिसून आले. पोलिसांनी नेहमीप्रमाणे ठसेतज्ञ, श्वानपथकाच्या साथीने पंचनामा वगैरे बाबी पार पाडल्या. पण, चोरटय़ांचा मागमूसही लागू शकलेला नाही. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून थांबलेला चोरटय़ांचा सुळसुळाट पुन्हा सुरू होण्याची शक्यता दिसत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दागिने, चांदीच्या वस्तू चोरीस
शहरातील जळकेवाडी येथे पत्रकार सदन असून त्याच्या तळमजल्यात भालचंद्र बाजीराव साटम, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांचा फ्लॅट आहे. साटम हे अन्यत्र राहत असले, तरी याठिकाणीही त्यांची ये-जा असते. साटम कुटुंबातील सदस्य गुरुवारीच फ्लॅटवर येऊन गेले होते. मात्र, शुक्रवारी सकाळी फ्लॅट फोडलेला असल्याचे दिसून आले. चोरटय़ांनी कुलपाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत बेडरुममधील कपाटाचा लॉकरही कोणत्या तरी हत्याराने फोडला. त्यात पांढऱया रंगाच्या कॅरिबागमध्ये ठेवलेले 80 हजार रुपये व कपाटातीलच जवळपास 15 हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या वस्तू लंपास केल्या. पाहणीत कपाटातील वस्तू, कपडे अस्तव्यस्त स्थितीत विस्कटलेले होते.
श्रीराम अपार्टमेंटमध्येही चोरी
पत्रकार सदनाच्या बाजूलाच श्रीराम अपार्टमेंट असून त्यातील ए विंगमधील दुसऱया मजल्यावर मनीषा शशिकांत गावकर यांचा फ्लॅट आहे. मनीषा यांचे वडील आजारी असल्याने ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यासाठी रात्री फ्लॅट बंद करून रुग्णालयात गेलेले गावकर कुटुंब सकाळी 6.30 वा. मागे आले असता, हा फ्लॅट फोडल्याचे दिसून आले. येथेही साटम यांच्या फ्लॅटप्रमाणेच कपाटे फोडून सर्व वस्तू इतस्तत: पसरल्या होत्या. तर कपाटातील लॉकरमध्ये असलेल्या पांढऱया पिशवीतील पर्समध्ये असलेले 40 हजार व लेडिज हँडपर्समध्ये असलेले 30 हजार असे 70 हजार रुपये चोरटय़ांनी चोरले.
तीन ठिकाणी चोरटे अपयशी
गावकर यांचा राहत्या फ्लॅटच्या बाजूला त्यांचाच फ्लॅट असून सध्या तो रंजन राणे यांना भाडय़ाने दिलेला आहे. मात्र, सध्या तो बंद असून राणे हे याच इमारतीत खालच्या मजल्यावर राहतात. चोरटय़ांनी त्या फ्लॅटलाही लक्ष्य केले. मात्र, तेथे त्यांच्या हाती काहीच लागू शकलेले नाही. श्रीराम अपार्टमेंटच्या बी विंगमध्ये बाळकृष्ण लक्ष्मण सावंत यांचा फ्लॅट आहे. हा फ्लॅटही सध्या बंद होता. तसेच जळकेवाडी परिसरातच उदय शिवाजी सावंत (मूळ रा. पोखरण) यांचा शिवनेरी महापर्व हा बंगला आहे. सावंत हे बाहेरगावी असल्याने बंगला बंद असून त्याच्या वरील भागात काही भाडेकरू आहेत. या तिन्ही ठिकाणीही चोरटय़ांनी कडीकोयंडे तोडून आत प्रवेश केला. मात्र, तेथे चोरटय़ांच्या हाती काही लागू शकलेले नाही.
पोलिसांकडून पंचनामा
या सर्व चोऱया सकाळी उघडकीस आल्यावर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाचही ठिकाणांचा पंचनामा केला. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. श्वानाला काही वस्तूंचा वास दिल्यानंतर तोही परिसरात फिरला, घुटमळला. तर ठसेतज्ञांनीही घटनास्थळांवरील काही ठसे घेतले.
चोऱयांची पोलिसांत फिर्याद
बंगला, फ्लॅट फोडय़ांबाबत मनीषा शशिकांत गावकर (49, रा. श्रीराम अपार्टमेंट-जळकेवाडी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नाथ पै नगर येथेही पावसकर यांच्या घराच्या काही पुढे असलेली दोन बंद घरेही फोडण्यात आली. मात्र, या घरात गेले कित्येक महिने कोणीही राहत नसल्याने या घरातून विशेष काही चोरीला जाण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे याबाबत पोलिसांतही नोंद नव्हती.
कणकवलीकर पुन्हा भीतीच्या छायेखाली
कणकवली शहराला मागील कित्येक वर्षांपासून चोऱया, घरफोडय़ांचे ग्रहण लागले आहे. वर्षानुवर्षे घरफोडय़ा होत आहेत. यात काहीवेळा चोरटे अटकही झाले. मात्र, चोऱया काही केल्या थांबल्या नाहीत. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून या चोऱया न झाल्याने नागरिकही निर्धास्त होते. मात्र, पुन्हा एकदा हा फ्लॅट, घरफोडय़ांचा प्रकार सुरू झाल्याने नागरिकांमधूनही भीती व्यक्त होत आहे.
पोलिसांसमोर आव्हान
एकीकडे कोरोना, त्यानंतरचे लॉकडाऊन यामुळे आधीच हवालदिल झालेले नागरिक आता लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्याने जेमतेम घराबाहेर पडू लागले आहेत. शहरात असे कित्येक नागरिक आहेत, जे मुळचे अन्य गावांमधील आहेत. परिणामी सणासुदीच्या काळात त्यांचे येथील फ्लॅट, घरे बंद आहेत. आता तर दिवाळी तोंडावर आली आहे. त्यात अशा घरफोडय़ांची मालिका सुरू झाल्याने नागरिक घाबरले आहेत. त्यामुळे पोलिसांनी रात्रगस्त वाढविणे, पोलीसमित्र वाढविणे, सीसीटीव्ही यंत्रणा योग्यप्रकारे कार्यान्वीत करणे आवश्यक आहे. ‘मॉकड्रील’मध्ये दाखविली जाणारी सतर्कता इथे प्रत्यक्षातही दाखवा, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.









