रामेश्वर प्लाझा परिसरात यावर्षीही भरले पावसाचे पाणी : ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका यावर्षीही
कणकवली:
शनिवारी सायंकाळी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱया कंपनीच्या निष्काळजीपणाचा नागरिकांना पुन्हा एकदा अनुभव आला. महामार्गावर हॉटेल गोकुळधामनजीक असलेल्या मोरीचा पाईप लहान असल्याने, परिणामी पाण्याचा निचरा होत नसल्याने बाजूच्या रामेश्वर प्लाझा इमारतीचा परिसर पाणीमय झाला होता. मागील वर्षाप्रमाणे नुकसानीला सामोरे जावे लागू नये म्हणून नागरिकांनी आपली वाहने तेथून सुरक्षित जागी हलविली होती.
या नाल्यातून कणकवलीच्या बहुतांश भागातील पाण्याचा निचरा केला जातो. मात्र, हायवे ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे गतवर्षी मुसळधार पावसात या नाल्याच्या मार्गातील हॉटेल गोकुळधामनजीकची मोरी तुंबून आजूबाजूच्या भागात पाणी घुसले होते. यात अनेकांच्या वाहनांचेही नुकसान झाले होते. दरम्यान, ही मोरी दुरुस्त करण्याबाबत न. पं.च्या बैठकीतही चर्चा झाली. तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही येथे मोठे पाईप घालावेत, अशी सूचना केली होती. मात्र, हायवे ठेकेदाराने मनमानीपणा करत नवीन मोरी बांधताना पाईप छोटेच ठेवले.
परिणामी शनिवारच्या मुसळधार पावसात पुन्हा एकदा गतवर्षाचा प्रकार घडला. यावेळी मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन नागरिकांनी तत्पूर्वीच आपली वाहने अन्यत्र हलविली होती. पुढे पावसाचा जोर कमी झाल्यनंतर पाणी ओसरले आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, या मोरीबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.









