कारवाईसाठी पोलिसांच्या सहकार्याने न. पं. चे पथक कार्यरत : अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठीही नियोजन
प्रतिनिधी / कणकवली
कणकवली शहर व परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठय़ा संख्येने सापडत असल्याच्या पार्श्वभूमीवर कणकवली न. पं. मार्फत घेतलेल्या निर्णयानुसार कणकवली शहरात रविवार 20 सप्टेंबरपासून पुढील आठ दिवस कडकडीत बंद पाळला जाणार आहे. हा बंद शंभर टक्के यशस्वी व्हावा, यासाठी न. पं. चे पथक कार्यरत असून पोलिसांचेही सहकार्य आहे. तर वेळप्रसंगी वैद्यकीयसारख्या अत्यावश्यक गरजेपासून कुणी वंचित राहू नये, यासाठीही नियोजन करण्यात आल्याची माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कोरोनाचे रुग्ण मोठय़ा संख्येने सापडत असल्याबाबत चर्चा करण्यासाठी येथील नगर वाचनालयात गुरुवारी बैठक पार पडली. यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बंदची आवश्यकता उपस्थित नागरिक, व्यापारी, लोकप्रतिनिधी आदींनी बोलून दाखविली. त्यानंतर अत्यावश्यक सेवेसह कणकवली शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता. त्यानुसार शहरातील सर्व हॉटेल, दुकाने वगैरे रविवार 27 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत.
बंदच्या नियोजनाविषयी माहिती देताना नलावडे म्हणाले, बऱयाचदा नागरिक अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीचे कारण सांगून बाजारात गर्दी करतात. त्यामुळे आम्ही दूध, मेडिकल या अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, घरोघरी दूधवितरण करणाऱयांना सकाळी 8 पूर्वी फक्त तासभरासाठी परवानगी ठेवून हा प्रश्नही सोडविला. तर मेडिकल व्यवसायिकांशी चर्चा झाली. त्यात काही मेडिकल व्यवसायिकांनी आठ दिवस मेडिकल बंद ठेवण्याचे मान्य केले. तर काहींनी गरजेनुसार ग्राहकांचे फोन आल्यास त्यांना आवश्यक औषधे पुरविण्याचे मान्य केले. याबाबतचे नियोजन नंदू उबाळे (9422054695) व सहकारी मेडिकल व्यावसायिक यांनी केले आहे.
…तर दंडात्मक कारवाई!
बंदच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलिसांची पथके शहरभर ठिकठिकाणी कार्यरत असणार आहेतच. पण, त्यांच्यासमवेत न. पं. ची पथकेही असणार आहेत. यात अत्यावश्यक कारणाशिवाय फिरणारे, मास्क न लावणे आदी कारणांसाठी दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही श्री. नलावडे यांनी दिला आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे!
सदरचा बंद हा नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, या हेतूने केलेला आहे. म्हणूनच यात नागरिकांची भूमिका महत्वाची असून त्यांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच काही तातडीची समस्या असल्यास नगर पंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहनही नलावडे यांनी केले आहे.









