22 टक्के असलेला कर 24 टक्के होणार : न. पं. च्या सर्वसाधारण बैठकीत करवाढीस मान्यता
वार्ताहर / कणकवली:
गेल्या 12 वर्षात शहरातील इमारतींचे फेरमूल्यांकन केलेले नाही. याबाबत शासनाने आदेश दिले असून त्यानुसार इमारतीच्या एकूण मूल्यांकनाच्या 2 टक्के मालमत्ता करात वाढ करण्याचा ठराव न. पं. बैठकीत घेण्यात आला. हा मालमत्ता कर रिटेबल व्हॅल्यूनुसार आकारणी करण्यात येणार आहे. यापूर्वी तो 22 टक्के होता, तो आता 24 टक्के करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. त्याला सभागृहाने मान्यता दिली. न. पं.च्या कचरा ठेक्याच्या मुद्यावरून पुन्हा तब्बल दिड तास चर्चा झाली. या मुद्यावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक अबिद नाईक व कन्हैया पारकर यांच्यात बाचाबाचीही झाली.
न. पं.ची बैठक नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, मुख्याधिकारी अतुल पिंपळे आदी उपस्थित होते.
जीआयएस सर्व्हेद्वारे मालमत्ताकर आकारणी करण्यात येणार असून एकूण मालमत्ता कर एप्रिलमध्ये भरणा केल्यावर त्यावर व्याज आकारणी होणार नाही. मालमत्ता कराची आहे, तेवढीच रक्कम भरणा करावी लागणार. त्यानंतर भरणा केलेल्या रकमेवर महिन्याला 2 टक्केनुसार व्याजाच्या रकमेत वाढ होणार आहे. जीआयएस मॅपिंगनुसार सर्व्हे करताना इमारतीचे मूल्यांकन करण्यात येणार असून इमारतीला किती वर्षे झाली, त्यावर त्या इमारतीचा कर ठरणार आहे. नवीन दरानुसार सद्यस्थितीत ज्या इमारतीचा कर 2 हजार असेल, त्याची फेरआकारणी केल्यावर त्यात 440 रुपयांची वाढ होणार आहे. शासनाने 21 ते 27 टक्के कर आकारणीत वाढ करण्याच्या सूचना दिल्या असताना न.पं.ने 24 टक्के वाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेतला.
ज्यांच्या घरापर्यंत रस्ता, पायवाट नाही, अशा इमारती अनधिकृत असल्या, तरी त्यांची कर आकारणी करण्याची सूचना रुपेश नार्वेकर यांनी मांडली. अजेंडय़ावरील विषयानुसार बैठक न सुरू करता आयत्यावेळच्या विषयाने कामकाज सुरू झाले.
न. पं.च्या कचरा टेंडरच्या मुद्यावरून कन्हैय्या पारकर यांनी पुन्हा सत्ताधाऱयांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र कालच्या बैठकीत तुम्ही विकासासाठी एकत्र येऊ, अशी भूमिका घेतलीत व आज भूमिका बदलली का? असा सवाल नगराध्यक्ष नलावडे यांनी केला. त्यावर अबिद नाईक यांनी आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी येथे आलो आहोत. कचरा हा शहराचा महत्वाचा विषय आहे, असा मुद्दा मांडला. त्यावर रुपेश नार्वेकर यांनी जनतेची लूट होता नये, असा मुद्दा मांडला. त्यावर नाईक व पारकर यांच्यात खडाजंगी झाली. बंडू हर्णे यांनी बैठकीचे काम हे अजेंडय़ावरील विषयानुसार चालले पाहिजे, असे सांगितले. कचरा ठेक्याचे दर हे पारकर सत्तेत असताना 42 टक्के वाढले. नंतर शासनाच्या आदेशानुसार या दरात वाढ झाली. त्यामुळे नार्वेकर यांनी जनतेची लूट म्हटली, ती त्यांच्या काळात वाढलेले 42 टक्के ही लुट होती की जनसेवा? असा सवाल हर्णे यांनी केला. यावेळी पारकर व नार्वेकर यांनी कचरा उचलला जात नाही. त्यामुळे यावर पर्यवेक्षण करणाऱयांवर कारवाईची मागणी केली. कचरा साठवला जात नाही, असेल तर ऍपवर तक्रार करा, तात्काळ कार्यवाही केली जाईल, असे नलावडे म्हणाले.
कचरा उचलण्यासाठी 55 कर्मचारी, सात ट्रक्टर सांगितले ते नसतात. शहरातील ज्या सात हजार मालमत्ता सांगितल्या त्या कशावरून मोजणी केली? असा सवाल पारकर यांनी केला. त्यावर शहरात 7284 मालमत्ता न. पं.कडे नोंद आहेत. रविवारीही कचरा उचलणे सुरू राहणार असल्याचे स्पष्टीकरण मुख्याधिकारी पिंपळे यांनी दिले.
कणकवली पर्यटन सुविधा पेंद्राचे नूतनीकरण तातडीने करावे, अशी मागणी नाईक यांनी केली. टेंबवाडी येथे रस्त्यावर सांडपाणी सोडणाऱयांवर काय कारवाई केली, असा सवाल मेघा सावंत यांनी केला. संबंधितांचा प्रांताधिकाऱयांकडे कारवाईचा प्रस्ताव पाठवा, अशी सूचना मुख्याधिकाऱयांनी दिली. गांगोवाडीत अंडरपासला जोडणारा टेंबवाडी रस्ता सखलात असल्याने तो हायवे अधिकाऱयांशी चर्चा करून उंच करणे गरजेचे आहे. अन्यथा अपघाताची भीती असल्याचा मुद्दा शिशीर परुळेकर यांनी मांडला. नगराध्यक्षांनी तात्काळ कार्यवाहीच्या सूचना सीओंना दिल्या. चर्चेत सुशांत नाईक, मेघा गांगण, सुमेधा अंधारी, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, अभिजीत मुसळे, ऍड. विराज भोसले आदींनी सहभाग घेतला.
गटाराचा ठेकेदार काळ्य़ा यादीत!
कामतसृष्टीकडील गटाराचे बांधकामाचे काम चार वर्षे होत आली, तरी अपूर्ण आहे. त्यामुळे त्या ठेकेदाराला काळ्य़ा यादीत टाका, अशी मागणी अबिद नाईक यांनी केली. मुख्याधिकाऱयांनी संबंधित ठेकेदाराला दोन नोटीस काढण्यात आल्या असून त्याला काळ्य़ा यादीत टाकण्याची कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.









