दूरदुंडेश्वर मठात पालखी सोहळा : जनावरांच्या प्रदर्शनाने शेतकऱयांचे मन वेधले : महाप्रसादाचा भाविकांनी घेतला लाभ

वार्ताहर /कडोली
‘हर हर महादेव’, ‘श्री दूरदुंडेश्वर महाराज की जय’च्या जयघोषात आणि विविध सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाने कडोली येथील श्री दूरदुंडेश्वर विरक्त मठात महाशिवरात्री उत्सव उत्साहात साजरा झाला.
बेळगाव नागनूर रुद्राक्षीमठाचे पूज्य श्री अल्लमप्रभू महास्वामीजी यांच्या हस्ते षटस्थल ध्वजारोहण होऊन मंगळवारी महाशिवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर मोफत आरोग्य शिबिर पार पडले. या शिबिरात विजया हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली बहुतांश नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. याचबरोबर कुस्ती आखाडय़ाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लहान-मोठय़ा अनेक कुस्त्या पार पडल्या. सायंकाळी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
बुधवारी सकाळी श्री दूरदुंडेश्वर मूर्तीला महारुद्राभिषेक घालण्यात आला. दुपारी 12 वाजता खास शेतकरी बंधूंसाठी जनावरांचे प्रदर्शन आणि कृषीविषयक साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले. श्री दूरदुंडेश्वर विरक्त मठाचे म. नि. प्र. गुरुबसवलिंग स्वामीजी यांच्या सानिध्यात कारंजीमठाचे म. नि. प्र. गुरुसिद्ध महास्वामीजी यांच्या हस्ते जनावरांच्या प्रदर्शनाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यामध्ये कडोली पंचक्रोशीतील गायी, वासरे, म्हैस, रेडकू, बैल, पाडी, शेळी, मेंढी अशा विविध जातीतील सुमारे 230 जनावरांचे प्रदर्शन झाले.
या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना म.नि.प्र. गुरुसिद्ध स्वामीजी यांनी सांगितले की, श्री दूरदुंडेश्वर मठाचा महिमा सर्वत्र आहे. या मठाच्या सानिध्यात आले की मनाला समाधान प्राप्त होते. जनावरांच्या प्रदर्शनातून शेतकऱयांना एक चांगला उद्देश देण्याचा प्रयत्न मठाच्यावतीने केला जात आहे. या उद्देशातून जनावरांच्या आरोग्याकडे लक्ष देता यावे, जनावरांची देखभाल कशी केली जाते? याविषयी शेतकऱयांना माहिती मिळते. तेव्हा या प्रदर्शनाचा उपयोग शेतकऱयांनी करून घ्यावा.
याप्रसंगी पशुसंगोपन खात्याचे साहाय्यक निर्देशक श्रीकांत गवी, कडोली पशुआरोग्य केंद्राचे डॉ. अनिलकुमार गंगारेड्डी, डॉ. चंद्र (काकती), डॉ. प्रताप हन्नूरकर (आंबेवाडी), डॉ. गुरू (सांबरा), डॉ. महादेव (हिरेबागेवाडी), डॉ. शशिधर (गजपती), डॉ. प्रशांत (हुदली), डॉ. शैलेश (येळ्ळूर) आदी डॉक्टरांनी जनावरांचे परीक्षण करून निवड केली.
पालखी सोहळा
दुपारी 12 वाजता श्री दूरदुंडेश्वर विरक्त मठातून टाळ-मृदंगाच्या आणि ढोल-ताशांच्या गजरात पालखी सोहळय़ाला प्रारंभ झाला. सदर पालखी गावात फिरून मठात आली. या सोहळय़ात कडोली पंचक्रोशीतील भजनी मंडळे, ढोलताशा पथक सहभागी झाली होती. म.नि.प्र. गुरुबसवलिंग स्वामीजी यांच्या हस्ते महाप्रसादाचे पूजन होऊन वाटप करण्यात आले. यावेळी कडोली, जाफरवाडी, अगसगा, गुंजेनहट्टी, केदनूर, बंबरगा, देवगिरी आदी भागातील हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.महाशिवरात्र उत्सव सांगता समारंभात जनावरांच्या प्रदर्शनात निवड झालेल्या स्पर्धकांना बक्षिसे वितरित केली.









