सर्वांनी लसी घेऊन भीती काढून टाकण्याचे आवाहन
वार्ताहर / कडोली
कडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिल्या टप्प्यात आशा कार्यकर्त्या, हॉस्पिटल कर्मचारी आणि अंगणवाडी कर्मचाऱयांना गुरुवारी कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा शुभारंभ झाला.
जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि रोपटय़ाला पाणी घालून लसीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना अरुण कटांबळे यांनी आता लस उपलब्ध झाल्याने कोरोनाचे भय नाहिसे होणार असून सर्वांनी या लसीचा उपयोग करून घ्यावा आणि मनातील भीती काढून टाकावी, असे सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्याधिकारी हळ्ळीकेरी यांनी सांगितले की, कोरोनावरील प्रभावी लस म्हणून सरकारकडून कोव्हिशिल्ड व्हॅक्सिन आपल्या केंद्रात उपलब्ध झाली असून प्रथमतः हॉस्पिटल कर्मचारी, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना ही लस देण्यात येत आहे. त्यानंतर दुसऱया टप्प्यात सर्व ग्रामस्थांना लस उपलब्ध होणार
आहे.
यावेळी नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य व माजी अध्यक्ष राजू मायाण्णा, गौडाप्पा पाटील, राजू कुटे, संजय कांबळे, सुनील पावणोजी, प्रेमा नरोटी, लक्ष्मी कुटे सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या व हॉस्पिटलचे कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. एस. वाय. हलभावी यांनी सूत्रसंचालन केले.









