मोहनराव यादव : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचेकडे मागणी
कडेगाव/प्रतिनिधी
कडेगाव तालुक्याच्या तहसीदार शैलजा पाटील यांचे बाबतीत तालुक्यातील जनतेत मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. त्यांच्या कामकाजाची पध्दत गैरव्यवहाराशी निगडीत आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी अशी मागणी जनहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहनराव यादव यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात मोहनराव यादव यांनी म्हटले आहे की, येरळा नदीपात्रातून होणाऱ्या अनधिकृत वाळू उपसा प्रकरणी वाळू माफीयांशी त्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत. त्यांच्या संगनमताने वाळू चोरी होत आहे, असे स्पष्ट झालेले आहे. विहापूर (ता. कडेगाव) येथील गट नं. १२३१ मध्ये दीड लाख ब्रास दगड उत्खनन अनधिकृत झाले आहे. त्यासाठी त्या जबाबदार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यांच्या सर्वच कामकाजाविषयी असलेल्या तक्रारींची योग्य चौकशी होणेसाठी त्यांना निलंबित करुन योग्य चौकशी करावी अशी मागणी आहे. महसूलचे विभागीय आयुक्त व सांगलीचे जिल्हाधिकारी यांनाही मोहनराव यादव यांनी सदरचे पत्र महितीस्तव पाठविले आहे.








